मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 377 धावा केल्या आहेत. भारताच्या या डावात रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतकी खेळी केली आहे.
मात्र या सामन्यातही भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला धावा करण्यात अपयश आले. तो 13 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. मागील काही सामन्यांपासून धोनी सातत्याने अपयशी ठरत आहे.
त्यामुळे त्याची फलंदाजीची सरासरी खाली घसरत आहे. तो 2011 पासून आत्तापर्यंत 50 पेक्षा अधिक सरासरी कायम ठेऊन खेळत आहे.
पण 1 नोव्हेंबरला तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात जर धोनीला 25 धावापेक्षा अधिक धावा करण्यात अपयश आले तर त्याची फलंदाजीची सरासरी 7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी होईल.
तसेच वनडे क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक सरासरी असणारे सध्या ३४ फलंदाज आहेत. यामध्ये धोनीचाही समावेश आहे. परंतू धोनीला ही सरासरी कायम ठेवण्यासाठी पुढील सामन्यात 25 पेक्षा अधिक धावा करणे गरजेचे आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या १३ पैकी केवळ धोनी आणि विराटची सरासरी ५०पेक्षा जास्त आहे. बाकी कोणत्याही खेळाडूची ही सरासरी ४४च्याही पुढे नाही. असे असताना आता ही सरासरी टिकविण्यासाठी धोनीला चांगली कामगिरी करावीच लागणार आहे.
धोनीने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 सामन्यातील 18 डावात खेळताना 28.42 च्या सरासरीने फक्त 398 धावा करता आल्या आहेत. यात त्याला एकच अर्धशतक करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली
–टॉप ७: मुंबईकर रोहित शर्माने मुंबईतच केले हे खास विक्रम
–विराट नाही तर रोहित शर्माच ठरला खरा किंग, जाणून घ्या काय आहे कारण…