नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक याच्या टी२० मालिकेतील कामगिरीनंतर उठलेले वादळ आजही थांबायचं नाव घेत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर नंतर आज माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही त्यावर निशाणा साधला आहे.
जर यापुढे संधी मिळूनही धोनीला हवी तशी कामगिरी करता आली नाही तर बीसीसीआयने दुसऱ्या पर्यायांचा विचार कराव असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.
धोनीने दुसऱ्या टी२० सामन्यात ३७ चेंडूत ४९ धावा केल्या होत्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे.
इंडिया टुडेशी बोलताना गांगुली म्हणाला, ” संघ व्यवस्थापनाने एकदा धोनीबरोबर बसून चर्चा करावी. त्याची नक्की भूमिका आणि त्याला त्याची कामगिरी सुधारण्यासाठी योग्य ती संधी द्यावी. “
“तो टी२० क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्यामुळे त्याला योग्य संधी मिळालीच पाहिजे. भारतीय संघ व्यवस्थापनाने २०१९ विश्वचषकाचाही विचार करावा आणि जर धोनीच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही तर नवीन पर्यायांचा विचार करावा. “
यापूर्वी धोनीच्या कामगिरीवर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी टीका केली होती तर सेहवाग, कर्णधार कोहली आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी धोनीला पाठिंबा दिला होता.
स्पोर्ट्स लाईव्ह अपडेट्स आमच्या फेसबुक पेजवर: Maha Sports महा स्पोर्ट्स