आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या 6 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. यासाठी भारताकडून सलामीला कोण येणार यावर पृश्वी शॉच्या संघाबाहेर जाण्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यातच एक कसोटी सामना खेळलेला हनुमा विहारीने सलामीला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला तरच तो सलामीला फलंदाजीला येण्यास तयार आहे असेही त्याने पुढे म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया एकादश विरुद्धच्या सामन्यात विहारीने पहिल्या डावात 53 तर दुसऱ्या डावात नाबाद 15 धावा केल्या.
“ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची एक वेगळीच शैली आहे. इंग्लड विरुद्धच्या सामन्यात मला कोहली आणि संघातील खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळाले. तसेच त्यांनी मला मदतही केली”, असे विहारी म्हणाला.
“मी ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये फलंदाजी केली, तशीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार. मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येण्यास तयार आहे. जर कोहलीने सलामीला खेळण्यास सांगितले तर मी तयार आहे”, असेही विहारी म्हणाला.
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात विहारीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 56 धावा केल्या. यावेळी त्याने 3 विकेट्सही घेतल्या होत्या. हा त्याचा पहिला कसोटी सामना होता.
जून-जुलैमध्ये भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात हनुमा विहारीने 8 सामन्यात 410 धावा करताना 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.
तसेच आॅगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन चार दिवसीय कसोटी सामन्यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतकासह तीन डावात 202 धावा केल्या आहेत. त्याच्या या तुफान कामगिरीमुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संघात स्थान मिळाले होते.
25 वर्षीय विहारीने प्रथम श्रेणीच्या 66 सामन्यात 15 शतके आणि 27 अर्धशतकांसह 59.48 च्या सरासरीने 5354 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 22 विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–२१२ वन-डे खेळलेला खेळाडू म्हणतो, कसोटी नकोच
–शंभर टक्के! तुम्ही असा स्कोअरबोर्ड कधी पाहिला नसेल
–क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका