भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव करत मालिकेत 1-1ने बरोबरी राखली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हा विजय संपूर्ण क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेटची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी ठरला आहे.
अशातच भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत असून, तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. सिडनी येथे आपला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपवत असलेल्या रोहितच्या आगमनाने भारतीय संघाला नवी ऊर्जा मिळाली आहे.
पण आता तिसऱ्या कसोटीत रोहितचा संघात समावेश केला, तर मयंक अग्रवालला संघाबाहेर बसावे लागू शकते. मयंक अग्रवाल संपूर्ण मालिकेत पूर्णतः अपयशी ठरत आहे. मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या 4 डावात त्याने अनुक्रमे 17,9,0,5 अशा धावा केल्या आहेत. मयंकने चार डावात मिळून केवळ 31 धावा केलेल्या आहेत.
दुसरीकडे आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच शुभमन गिलने दोन्ही डावात उत्तम कामगिरी केलेली आहे. गिलने पहिल्या डावात 45 तर दुसर्या डावात नाबाद 35 धावांची खेळी केली. अशा परिस्थितीत गिलचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. त्यामुळे रोहित परत आला तर तो सलामीला खेळेल आणि त्याच्यासह गिल सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मयंकला संघातील स्थान सोडावे लागू शकते.
रोहितच्या पुनरागमनाने भारतीय संघाला आणखीनच ताकद मिळाली असून, सर्वांना रोहितकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय संघ, सिडनी येथील सामन्यात कशाप्रकारे कामगिरी करतो याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
साल २०२० केएल राहुलसाठी ठरले खास, विराट, रोहितलाही टाकले मागे






