अहमदाबाद येथे गुरुवारी (२४ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांचे तोड काढण्यात आले. दरम्यान बीसीसीआयला एक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला, ज्यामुळे बोर्डाला ९०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान होऊ शकते.
काही महिन्यांपुर्वी आयसीसीने बीसीसीआयला म्हटले होते की, जर त्यांना आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि आयसीसी वनडे विश्वचषक २०२३चे आयोजन करायचे असेल, तर त्यांना आयसीसीला कर भरण्यात काही सवलत द्यावी लागेल. जर बीसीसीआयने असे नाही केले तर या दोन्ही विश्वचषकांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत (युएई) करण्यात येईल. त्यामुळे बीसीसीआयने आयसीसीची ही अट मान्य केली होती.
यानंतर नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान बीसीसीआयने टी२० विश्वचषक २०२१ आणि वनडे विश्वचषक २०२३च्या आयोजनासाठी मार्ग शोधला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष अरुण धूमाळ यांना भारतीय केंद्र सरकारशी विश्वचषक आयोजनासाठी लागणाऱ्या रक्कमेच्या करात सवलत देण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पाठवले जाणार आहे.
असे असले तरी जर भारत सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली नाही, तर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते. कारण आयसीसीची कर सवलतीची अट बीसीसीआय पूर्ण करू शकले नाही तर बीसीसीआयला १२३ मिलियन अमेरिकी डॉलर (भारतीय रक्कमेनुसार ९०५ कोटी) आयसीसीला द्यावे लागू शकतात.
बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात कर सवलतीचा वाद २०१६ सालच्या टी२० विश्वचषकापासून चालू आहे. या विश्वचषकाचे आयोजन भारताने केले होते. मात्र त्यावेळी भारत सरकारने बीसीसीआयला करामध्ये सूट दिली नव्हती. यामुळे आयसीसीला मोठे नुकसान झाले होते आणि पुढे बीसीसीआयकडून या नुकसानाची भरपाई करून घेतील, असे आयसीसीने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
अनुभव कर्णधारपदाचा! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कशी राहिली भारतीय संघाची कामगिरी, पाहा