मुंबई । माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. आयसीसीच्या सर्वच ट्रॉफी भारतीय संघाला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक खेळाडूंना घडवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. युवा खेळाडूंना संधी देऊन प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेण्यात धोनी तरबेज आहे. एका उत्तम कर्णधाराचे सर्व गुण त्यांमध्ये आहेत. भारताच्या या माजी कर्णधाराबाबत एस. बद्रीनाथ याने धोनीविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
बद्रीनाथ म्हणाला, “एखाद्या खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे आणि ज्यांच्यावर त्याचा विश्वास आहे. तो त्याला सपोर्ट करेल. जर त्याला वाटले की, त्या खेळाडूंमध्ये प्रतिभा नाही तर देव जरी आला तरी धोनीच्या विचारात बदल करू शकणार नाही.”
एस. बद्रीनाथ हा धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या सीएसके संघात खेळला आहे.”
“धोनीला वाटते की प्रत्येकाची भूमिकाही महत्त्वाची असते. त्याने जर ती भूमिका योग्य पद्धतीने निभावली तर संघाला संकटातून बाहेर काढून विजय मिळवून देऊ शकतो. मी मधल्या फळीत फलंदाजी करायचो. खेळाडूंना अतिरिक्त संधी देणे हीच धोनीची सर्वात मोठी ताकद आहे. जे चांगले वाटते त्याला तो फॉलो करत असतो. त्याला जर वाटले नाही की आपण योग्य नाही तर देव देखील आपली मदत करू शकत नाही. तो त्याच्या स्वतःच्या विचारानुसार काम करतो. दुसऱ्यांच्या विचारानुसार तो काम करत नाही,” असे बद्रीनाथने सांगितले.
संघाच्या ड्रेसिंग रुम मधल्या वातावरणाबाबत एस. बद्रीनाथ बोलताना म्हणाला, “संघाची कामगिरी कशीही झाली असली तरी संघ मालकांचे वर्तन हे सामान्यच असायचे. त्यामुळे टीममधील वातावरण चांगले होते. संघमालक नेहमी आम्हाला एक चॅम्पियन संघ म्हणूनच पाहत आहेत.”





