श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याची रंगतदार लढत झाल्यानंतर मंगळवारी (२० जुलै) उभय संघ दुसरा वनडे सामना खेळणार आहेत. आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे हा सामना होणार आहे. आपली विजयी लय कायम राखत भारतीय संघ सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे श्रीलंका संघ दमदार पुनरागमन करत मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहल याला मोठा किर्तीमान करण्याची संधी असेल.
चहलने आतापर्यंत ५५ वनडे सामने खेळताना एकूण ९४ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत चहलने ६ विकेट्स घेतल्या तर तो संघ सहकारी मोहम्मद शमी याच्या सर्वात जलद १०० वनडे विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी करेल. शमी हा वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान १०० गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने ६ वर्षे १७ दिवसांच्या कालावधीत ५६ वनडे सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला होता. (If Yuzvendra Chahal Pick 6 Wickets In 2nd ODI, He Will Equals Shami’s Fastest 100 ODI Wickets Record)
जर त्याला दुसऱ्या वनडे सामन्यात ६ विकेट्स घेता आल्या नाहीत. तर पुन्हा तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात त्याच्याकडे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बरोबरी करण्याची संधी असेल. बुमराहने एकूण ५७ वनडे सामन्यात १०० विकेट्सचा आकडा गाठला होता. यासह तो सर्वात जलद वनडे विकेट्सचे शतक करणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याच्यानंतर चहलचा फिरकी जोडीदार कुलदीप यादव ५८ वनडेत १०० विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसे तर, वनडे क्रिकेटमध्ये ६ विकेट्स घेणे हे काही सोपे काम नाही. परंतु चहलने यापुर्वी हा अतुलनीय पराक्रम केला आहे. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या वनडे सामन्यात १० षटकात ४२ धावा देत ६ विकेट्स चटकावल्या होत्या. ही त्याची वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. अशात चहल श्रीलंकाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात या कामगिरीची पुनरावृत्ती करेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अनेकांना निवृत्तीनंतर महान खेळाडूची उपाधी मिळते, पण विराट ३०व्या वर्षीच लिजेंड बनलाय’
इंग्लंडमध्ये टीम विराट-रोहितशी भिडला अश्विन-पुजाराचा संघ, बघा चुरशीच्या लढतीत कोण ठरलं विजेता
आता मंत्रीच खेळणार क्रिकेट, क्रीडामंत्र्याची झालीय संभाव्य रणजी संघात निवड