आयपीएल २०२२ च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) आमने-सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिट्लनेस ४ विकेट्स शिल्लक ठेऊन विजय मिळवला. या विजयात दिल्लीच्या कुलदीप यादवचे योगदान मोठे म्हणावे लागेल. त्याने प्रथम गोलंदाजी करताना संघाला तीन महत्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. मागच्या वर्षी कुलदीप यादवला त्याच्या खराब प्रदर्शनामुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नव्हती, पण या हंगामात त्याने जोरदार सुरुवात केली आहे. दिल्ली गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेलने कुलदीपच्या या पुनरागमनामागचे कारण स्पष्ट केले आहे.
अक्षर पटेल (Axar Patel) याच्या मते दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संघात सुरक्षित वातावरण दिले आहे आणि त्याचा परिणाम कुलदीपच्या प्रदर्शनावर दिसत आहे. मागच्या हंगामापर्यंत कुलदीप केकेआरचा खेळाडू होता आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी झगडावे लागत होते. पण नवीन संघासाठी पदार्पण करताच त्याने चांगल्या प्रदर्शनाला सुरुवात केली आहे.
अक्षर पटेल म्हणाला की, “या सर्व मानसिक गोष्टी आहेत. कुलदीप आयपीएलमध्ये संघर्ष करत होता, कारण केकेआरमध्ये त्याची जागा सुरक्षित नव्हती. त्याला विश्वास नव्हता तो सर्व सामने खेळेल.”
“त्याला आता वाटत आहे की, या संघात आल्यानंतर सामना खेळणे सुनिश्चित आहे. जर तुम्हाला माहिती आहे की, तुमची जागा पक्की आहे आणि दोन सामन्यात खराब प्रदर्शन केल्यामुळे तुम्ही संघातून बाहेर होणार नाहीत, तर मग तुम्ही स्वतःचे सर्वश्रेष्ठ देऊ शकता. ज्या पद्धतीने प्रशिक्षक रिकी पॅंटिंग आणि कर्णधाराने (रिषभ पंत) त्याचे समर्थन केले आहे, त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ खेळी करू शकला. सराव करतानाही आम्ही त्याला म्हणतो की, तू चांगले प्रदर्शन करू शकतो. यामुळे त्याच्या मानसिकतेत बदल होतो की, तो सर्व सामने खेळणार आहे,” असे अक्षर पुढे बोलताना म्हणाला.
कुलदीपने मुंबईच्या ज्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश होता. सामन्याचा विचार केला, तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य १८.२ षटकात आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. कुलदीप सामनावीर ठरला. तर दुसरीकडे अक्षर पटेल आणि ललित यादवनेही शेवटच्या षटकांमध्ये धमाकेदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन!’, पंजाबविरुद्ध २०५ धावा करूनही पराभव झाल्याने आरसीबी ट्रोल
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल गुजरात वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही