भारतीय संघाचा युवा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव हा जगभरातील फलंदाजांसाठी एका कठीण कोड्यासारखा आहे. मनगटाचा उत्तम वापर करत फिरकी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज कधी चेंडूला नवीन पद्धतीने फिरवेल, याचा अंदाज लावणे फलंदाजांना खूप अवघड जाते.
३ वर्षांपुर्वी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणारा कुलदीप हा २०१९ सालच्या विश्वचषकामध्येही खेळला. परंतु, त्यानंतर तो संघातून आत-बाहेर होऊ लागला.
याविषयी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कुलदीप म्हणाला की, “मी बऱ्याच महिन्यांपासून घरी आहे. दरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवत मी पेंटिंग्स करणे, पतंग उडवणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. हे ठीक आहे की प्रत्येक खेळाडूला ब्रेक पाहिजे असतो. पण, माझा ब्रेक खूपच मोठा झाला आहे. मी माझ्या गोलंदाजीचे बरेच व्हिडिओ पाहिले. त्यामुळे मी काही चांगल्या गोष्टी शिकलो. तर, छोट्या-छोट्या चुकांचीही मला जाणीव झाली. मी त्या चुकांवर आता काम करु शकतो.”
एमएस धोनी नेहमी यष्टीमागून तुला मार्गदर्शन करत असायचा. पण २०१९मधील विश्वचषकापासून तो भारताकडून खेळला नाही. म्हणून काही बदल जाणवतात का? असा प्रश्न विचारला असता कुलदीप म्हणाला की, “हो. माहीने नेहमी मला मार्गदर्शन केले आहे. कारण, यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा सर्वात चांगला जज असतो. माहीसारख्या अनुभवी यष्टीरक्षकाला कोणता फलंदाज कसा खेळतो, याचा चांगला अंदाज होता. ही सर्वकाही सांघिक कामगिरी असते. पण, माही विश्वचषकापासून खेळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यावर अवलंबून होतो.”
तसेच, आपल्या शेवटच्या कसोटी सामन्याची आठवण काढत कुलदिप म्हणाला की, “आपल्याला नेहमी आपल्या संघातील स्थानाची चिंता न करता खेळायचे असते आणि स्वत:ला सिद्ध करायचे असते. मी नेहमी प्रयत्न करत असतो की, मला संधी मिळाल्यावर मी संघाच्या अपेक्षा पूर्ण करेन आणि चांगला खेळेन. माझ्यासाठी नेहमी माझा संघ प्रथम येतो.”
कुलदीपने त्याच्या कारकिर्दीत ६ कसोटी सामन्यात २४ विकेट्स, ६० वनडे सामन्यात १०४ विकेट्स आणि २० टी२० सामन्यात ३९ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो
आता क्रिकटर्सला रहावे लागणार पत्नींपासून दूर; बोर्डाने सांगितले…
नेपोटिझमच्या झळा आता क्रिकेटमध्येही, प्रणव धनावडेला संधी न मिळाल्याने…