काल हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूत १७१ धावांची खेळी करणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला आज घरचा रस्ता दाखवला. याबरोबर जुने व्याज कर्जसहित परत केले.
ज्या हरमनप्रीत कौरवर ९१ मीटर षटकार मारला म्हणून २००९ साली ऑस्ट्रेलियाने डोपिंग टेस्टची मागणी केली त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने काल तब्बल ७ षटकार खेचले.
२००९ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात सिडनी क्रिकेट मैदानावर हरमनप्रीत कौरने ९१ मीटर षटकार खेचला होता. तिच्या त्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवला होता. त्यावेळी १९ वर्षीय हरमनप्रीतवर त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने डोपिंगचे आरोप करून तिची टेस्ट घेण्याची मागणी केली. विशेष म्हणजे त्यातून तिला क्लीन चिट मिळाली.
१४ मार्च २००९ साली झालेल्या या सामन्यात तिने ८ चेंडूत १९ धावा करताना २ चौकार आणि १ षटकार मारला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया १६ धावांनी पराभूत झाली होती.
काल त्याच हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलिया संघाला पुन्हा एकदा स्पर्धेतून बाहेर करत नवा विक्रम केला. तसे तिचे आणि ऑस्ट्रेलिया काही विशेष आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातच ह्याच कालावधीमध्ये हरमनप्रीत कौरबद्दल भारतीय माध्यमे आणि क्रिकेट चाहत्यामंध्ये जोरदार चर्चा झाली होती. कारण ती पहिली अशी भारतीय खेळाडू होती जी परदेशी टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी करारबद्ध झाली होती. ऑस्ट्रेलियामधील सिडनी थंडर या क्लबने तिला बिग बॅश लीगसाठी करारबद्ध केले होते.