कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघाने ३ बाद ६३ वरून चांगली कामगिरी करत ४२ षटकांत २०१ अशी चांगली कामगिरी केली आहे.
पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने तिसऱ्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर निरोशन डिकवेल्लाला स्वतःकडे झेल द्यायला भाग पडले. त्यानंतर ७व्या षटकात दिलशान मुनावीरा भुवनेश्वर कुमारच्याच गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीकडे झेल देऊन माघारी परतला आहे. त्याने ५ चेंडूत ४ धावा केल्या.
फटकेबाजी करत उपुल थरांगाने एका बाजूने किल्ला लढवला. परंतु तोही १०व्या षटकात ३४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. त्यांनतर डावाची सूत्रे हाती घेत लिहिरू थिरीमाने आणि अँजेलो मॅथेवस यांनी अर्धशतके झळकावली. १०२ चेंडूत थिरीमानेने ६७ धावांची खेळी केली. त्याला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचित केले.
थिरिमाने नंतर अँजेलो मॅथेवसही ४२व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ९८ चेंडूत ५५ धावा केल्या.
तत्पूर्वी आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेत श्रीलंका संघाने केवळ दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे.