आयपीएल 2025 (IPL 2025) मधील मुंबई इंडियन्सचा प्रवास आता संपला आहे. पंजाब किंग्जने क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करून त्यांचे सहावी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग केले. मुंबई इंडियन्सच्या पराभवात देखील सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar yadav) इतिहास रचला आहे. या सामन्यात सूर्याने एक विशेष कामगिरी केली आहे आणि आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.
पंजाब किंग्ज (Punjab king’s ) विरुद्ध, सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा शानदार फलंदाजीचा पराक्रम सादर केला. या सामन्यात त्याने आपले अर्धशतक हुकवले असले तरी, त्याने 15 धावा काढल्याने सूर्यकुमारच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवली गेली. सूर्यकुमार यादव आता आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा नॉन-ओपनर फलंदाज बनला आहे. यासोबतच त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. आयपीएल 2016 मध्ये आरसीबीकडून (RCB) खेळताना एबी डिव्हिलियर्सने 16 सामन्यांमध्ये 687 धावा करून हा विक्रम केला होता. जो आता मोडला गेला आहे. सूर्यकुमार यादवने या हंगामात 16 सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करताना 167.92 च्या स्ट्राइक रेटने 717 धावा केल्या. या काळात सूर्याच्या बॅटने 5 अर्धशतके ठोकली आहेत.
सूर्यकुमार यादवसाठी सीझन-18 हा उत्तम राहिला आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. याशिवाय, सूर्या ऑरेंज कॅप जिंकण्याचा प्रबळ दावेदार होता, परंतु क्वालिफायर 2 मधील पराभवानंतर त्याचे स्वप्न भंगले. ऑरेंज कॅपच्या यादीत सूर्या दुसऱ्या स्थानावर आहे. जर मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 2 जिंकला तर सूर्याला अंतिम फेरीत पुन्हा ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी होती. सध्या ऑरेंज कॅप गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनकडे (Sai sudarshan) आहे, ज्याने या हंगामात सर्वाधिक फलंदाजी करताना 15 सामन्यांमध्ये 759 धावा केल्या आहेत.