जागतिक क्रिकेटमध्ये वनडे सामन्यांची सुरूवात १९७१ साली झाली. क्रिकेटच्या या नवीन प्रकारात खेळण्यासाठी सर्वच संघांना उत्सुकता लागून राहिलेली. भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना १९७४ साली लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
भारताने आतापर्यंत एकूण ९८७ वनडे सामने खेळले आहेत. यात ५१३ सामन्यात विजय, तर ४२४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याव्यतिरीक्त ९ सामने बरोबरी सुटले आहेत, तर ४१ सामन्यांचा निकाल लागला नाही म्हणजेच अनिर्णित राहिले. भारत जगातील सर्वाधिक वनडे सामने खेळणारा संघ आहे.
भारताने सर्वात जास्त वनडे सामने श्रीलंकेविरूध्द (Sri Lanka) खेळले आहेत. या १५९ सामन्यांपैकी ९१ मध्ये विजय मिळवला आहे. तर ५६ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत वनडे क्रिकेटमध्ये या ३ संघांकडून झालाय सर्वाधिकवेळा पराभूत- In ODI’s these 3 teams Beat India the most Matches
ऑस्ट्रेलिया – ७८ सामने
भारतीय क्रिकेट संघाला सुरूवातीपासून पाकिस्तान व्यतिरिक्त कोणी टक्कर दिली असेल, तर तो आहे ऑस्ट्रेलियन संघ. भारताला ऑस्ट्रेलियाविरूध्द (Australia) सर्वात जास्त वनडे सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान १४० सामने झाले आहेत. भारत ५२ सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी झाला आहे. तर ७८ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. याव्यतिरीक्त १० सामने अनिर्णीत राहिले.
पाकिस्तान- ७३ सामने
भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) आहे. या शेजारी राष्ट्राबरोबर जेव्हा सामना असतो तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. दोन्ही संघांना विजयापेक्षा इतर काही नको असते.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानविरूध्द चांगला विक्रम नाही. अलीकडील काही वर्षांत भारताने जरी पाकविरूध्द दबदबा निर्माण केला असला, तरी एकंदरीत पाकिस्तानच वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांदरम्यान १३२ वनडे सामने खेळले आहेत. भारताने पाकविरूध्द ५५ सामने जिंकले असून पाकने ७३ सामन्यात विजयश्री खेचून आणली आहे.
वेस्ट इंडीज- ६३ सामने
वनडे क्रिकेट खेळायला सुरूवात झाली होती तेव्हा वेस्टइंडीजचा क्रिकेटमध्ये दबदबा होता. त्यावेळी वेस्ट इंडीजला (West Indies) नमवणे अशक्यप्राय गोष्ट होती. मागील काही वर्षात वेस्ट इंडीज क्रिकेटचा आलेख दिवसेंदिवस खाली घसरत आहे.
वेस्ट इंडीजने सुरूवातीच्या काळात भारताला खूपवेळा नमवले आहे. दोन्ही देशांदरम्यान १३३ वनडे सामने खेळले आहेत. विंडीजने भारताला ६३, तर भारताने विंडीजला ६४ सामन्यांमध्ये नमवले आहे. यातील २ सामने बरोबरी सुटले आहेत, तर ४ सामने अनिर्णित राहिले. भारताने विंडीजवर शेवटच्या १८ पैकी १२ सामन्यांमध्ये विजय मिळवला केला आहे, तर ३ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला.