महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(MPL) 2025 स्पर्धेत क्वालिफायर 1 लढतीत कर्णधार फिरकीपटू प्रशांत सोळंकी याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह मंदार भंडारी याने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने 4एस पुणेरी बाप्पा संघाचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधीच्या साखळी फेरीच्या लढतीत ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध 4एस पुणेरी बाप्पा संघ दोनवेळा आमने सामने आले होते. यामध्ये नाशिक संघाने पुणेरी बाप्पा संघाला दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात 4एस पुणेरी बाप्पा संघ आपली पराभवाची मालिका खंडित करण्यास उत्सुक होते. परंतु ईगल नाशिक टायटन्स संघाने 4एस पुणेरी बाप्पाविरुद्ध विजय मिळवत आपली अपराजित राहण्याची मालिका कायम राखली.
सलामवीर यश नाहर ला नाशिकच्या मुकेश चौधरीने पहिल्या षटकात पाचव्या चेंडूवर झेल बाद केले व पुणेरी बाप्पा संघाला पहिला धक्का दिला. मुर्तुझा ट्रंकवालाने 21 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावांची खेळी केली. मुर्तुझा व ऋषिकेश सोनावणे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 55 धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. हि भागीदारी डोकेदुखी बनत चालली असताना कर्णधार प्रशांत सोळंकी स्वतः गोलंदाजीस आला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात अखेरच्या चेंडूवर मुर्तुझा ट्रंकवालाला झेल बाद केले. पाठोपाठ यश क्षीरसागर 12 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर पुणेरी बाप्पाची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. प्रशांत सोळंकीने एकाच षटकात दोन गडी बाद करून पुणेरी बाप्पा संघाची मधली फळी मोडून काढली. त्याने 14 व्या षटकात 4 थ्या चेंडूवर अद्वैय शिधये ला झेल बाद केले आणि पाठोपाठ पाचव्या चेंडूवर सचिन भोसले ला त्रिफळा बाद केले. पुणेरी बाप्पाच्या ऋषिकेश सोनावणे याने एका बाजूने लढताना 52 चेंडूत नाबाद 67 धावांची दमदार खेळी केली. त्याने 6 चौकार व 3 षटकार खेचले. सूरज शिंदेने पहिल्यांदाच नवव्या क्रमांकास फलंदाजीस उतरला. त्याने 15 चेंडूत 22 धावांची आक्रमक खेळी केली. सूरजने 2 चौकार व 1 षटकार मारला. ऋषिकेश व सुरज यांनी आठव्या विकेटसाठी 27 चेंडूत 39 धावांची भागीदारी करून 4एस पुणेरी बाप्पा संघाला 20 षटकात 8 बाद 153 धावा अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ईगल नाशिक टायटन्सकडून फिरकीपटू प्रशांत सोळंकीने 23 धावात सर्वाधिक 3 बळी टिपले. त्याला अक्षय वैकर, मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी तर, रोहन दामल ने एक गडी बाद करून साथ दिली.
154 धावांचे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने 17.2 षटकात 2 बाद 157 धावा करून पूर्ण केले. मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी या जोडीने 52 चेंडूत 69 धावांची सलामी दिली. यात अर्शिन कुलकर्णी 24चेंडूत 22 धावा काढून तंबूत परतला. त्याने 2 चौकार मारले. मंदार भंडारीने 40 चेंडूत 58 धावांची झंझावाती खेळी केली. मंदारने 2 चौकार व 4 षटकार ठोकले. मंदारला पुणेरी बाप्पाच्या रोशन वाघसरेने झेल बाद केले. त्यानंतर अक्षय वैकरच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरलेल्या साहिल पारीख नाबाद 23 धावा, रणजीत निकम नाबाद 6 धावांवर खेळत होता. यावेळी ईगल नाशिक टायटन्स संघ 13 षटकात २बाद 114 धावा असताना पाऊस सुरु झाला. पावसाच्या विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरु झाला. त्यावेळी ईगल नाशिक टायटन्ससमोर विजयासाठी 42 चेंडूत 40 धावा असे समीकरण होते. साहिल पारीखने 24 चेंडूत नाबाद 38 धावांची सुरेख खेळी केली. त्यात त्याने 3 चौकार व 3 षटकार मारले. तर, रणजीत निकमने 16 चेंडूत नाबाद 33 धावांची दमदार खेळी केली करून साथ दिली. साहिलने रणजीतच्या समवेत 33 चेंडूत 63 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
सांघिक कामगिरीच्या जोरावरच आतापर्यंतचे यश कर्णधार – प्रशांत सोळंकी
अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याचे श्रेय आमच्या संघातील माझ्या प्रत्येक सहकार्याचे तसेच संघाबरोबर असलेल्या सर्व सपोर्ट स्टाफच्या सहकार्याचे हे फलित आहे. अंतिम सामन्यात कोणताही प्रतिस्पर्धी आला तरी आम्ही कोणत्याही दडपणाखाली खेळणार नाही. कारण आतापर्यंत या स्पर्धेत आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरीतही आमचे खेळाडू तशीच कामगिरी करतील अशी मला खात्री आहे, असे ईगल्स नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार प्रशांत सोळंकी याने सांगितले. महाराष्ट्र प्रीमियम लीग 2025 स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा हा पहिला संघ आहे.





