पुणे, २२ जुलै २०२३ : भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरत कमलने अविश्वसनीय खेळ करताना देशातील अव्वल खेळाडू हरमीत देसाईवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्याच्या या विजयाने चेन्नई लायन्सने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत गोवा चॅलेंजर्सवर ११-४ निर्विवाद वर्चस्व गाजवत बाजी मारली. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये चेन्नई लायन्सने ३५ गुणांसह तालिकेत अव्वल स्थान मजबूत केले.
भारताच्या दोन्ही खेळाडूंमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेला शरत आणि युवा खेळाडू हरमीत यांच्या खेळाने प्रेक्षकांनाही खिळवून ठेवले. पहिल्या गेममध्ये शरत कमलने ११-९ अशी बाजी मारली. हरमीतच्या आक्रमक खेळाला त्याने शांत व संयमी खेळ करून प्रत्युत्तर दिले. १३ राष्ट्रकुल पदकं नावावर असलेल्या शरतने दुसऱ्या गेममध्येही ११-९ अशी बाजी मारून फ्रँचायझीसाठी विजयी आठवा गुण पक्का केला. शरतने तिसऱ्या गेममध्ये ११-८ असा विजय मिळवला.
दिवसाच्या शेवटच्या सामन्यात यांग्झी लियूने २-१ अशा फरकाने रिथ तेनिसनवर विजय मिळवून गतविजेत्या चेन्नई लायन्सचे निर्विवाद वर्चस्व कायम राखले. भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
याआधी, चेन्नई लायन्सच्या बेनेडिक्ट डुडाने रोमहर्षक लढतीत अलव्हारो रॉब्लेसवर २-१ असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या डुडाने सकारात्मक सुरुवात केली आणि पहिल्या गेममध्ये काही सुरेख फोरहँड फटके मारून ११-५ असा विजय मिळवला. गोवा चॅलेंजर्सच्या खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना ११-८ अशी बाजी मारली आणि ही लढत रोमांचक वळणावर आणली. तिसऱ्या गेममध्ये मात्र डुडाने ११-७ अशी बाजी मारली.
दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावरील सुथासिनी सवेत्तबटने गोवा चॅलेंजर्सला विजय मिळवून देताना सुतिर्था मुखर्जीवर २-१ अशी बाजी मारली. भारतीय खेळाडूला लीगमधील मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागली होती, परंतु आज तिने तिचा नैसर्गिक खेळ करताना सुथासिनीवर दडपण निर्माण केले. सुतिर्थाने पहिल्या गेममध्ये थायलंडच्या खेळाडूवर ११-८ असा विजय मिळवला.
दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली आणि प्रत्येक गुणांसाठी रंगलेली चुरस पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हा गेम सुथासिनीच्या पारड्यात गेला. तिसऱ्या गेममध्ये सुतिर्थाने सकारात्मक सुरूवात करताना ४-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु गोवा चॅलेंजर्सच्या खेळाडूने ५-४ असा गेम पलटवला. तिने फोरहँडचे सुरेख फटके मारून हा गेम ११-६ असा जिंकला.
मिश्र दुहेरीत शरत कमल/यांग्झी लियू या जोडीने हरमीत/सुथासिनीवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. शरत/यांग्झी यांच्यातलं अप्रतिम ताळमेळ विजयासाठी महत्त्वाचे ठरले. या दोघांनी पहिले दोन गेम ११-६, ११-६ असे सहज घेतले. तिसऱ्या गेममध्ये चेन्नई लायन्सच्या जोडीला थोडा संघर्ष करावा लागला, परंतु त्यांनी गोल्डन गुण घेत बाजी मारली. (in Ultimate Table Tennis 2023 Chennai Lions win over Goa Challengers)
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 500व्या सामन्यात अश्विन-जडेजा जोडीही पूर्ण करणार 500चा आकडा? माजी दिग्गजांचा विक्रम मोडणार
WI vs IND । तिसरा दिवस जयमान संघाच्या नावावर, पण भारताची आघाडी कायम