भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या आशिया चषकातील सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडताना दिसला. केएल राहुल पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर, रोहित शर्मा विराट कोहली यांनी भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र, चांगली सुरुवात मिळाल्यानंतर दोघेही खराब फटके मारून बाद झाले.
प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार याच्या नेतृत्वात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानला पूर्ण वीस षटके न खेळू न देता 147 धावांवर सर्वबाद केले.
प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर केएल राहुल खातेही न खोलता दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी सावधगिरीने तसेच खराब चेंडूवर आक्रमण करत भारताची धावसंख्या वाढवली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावा केल्या. रोहित 18 चेंडूंवर 12 धावांची संथ खेळी करत बाद झाला. नवाजने त्याला आपल्या पहिल्या षटकाच्या अखेरच्य चेंडूवर बाद केले. त्यानंतर पुढच्या षटकात पुन्हा पहिल्या चेंडूवर त्याने विराटला फसवले. विराटने 34 चेंडूंवर 35 धावांची खेळी केली.