भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. ही मालिका ऑस्ट्रेलियात आयोजित होत असल्यामुळे तुम्हाला भारतात या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अलार्म सेट करावा लागेल.
पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचं पहिले सत्र भारतीय वेळेनुसार सकाळी 7:50 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 7:20 वाजता होईल. पहिलं सत्र सकाळी 7.50 ते 9.50 पर्यंत चालेल. लंच ब्रेकनंतर दुसरं सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत होईल. यानंतर चहापानाचा ब्रेक होईल आणि शेवटच्या सत्राचा खेळ दुपारी 12.50 ते 2:50 पर्यंत चालेल. येथे दिलेली वेळ भारतीय वेळेनुसार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकाल. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनं 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला. ताज्या रिपोर्ट्सनुसार, रोहित 24 नोव्हेंबरपर्यंत पर्थमध्ये टीम इंडियात सामील होणार असून तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे.
पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीबाबत बोलायचं झाल्यास, पर्थच्या पिचवर हिरवं गवत दिसू लागलं आहे. येथे वेगवान गोलंदाजांसाठी खूप काही असेल. मात्र सामन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत फिरकीपटूंनाही चांगली मदत मिळू शकते. येथे प्रथम फलंदाजी करणे हा चांगला पर्याय असेल. असं असलं तरी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अत्यंत सावधपणे खेळावं लागेल. येथे आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा झाला आहे.
हेही वाचा –
वीरेंद्र सेहवागच्या मुलाची झंझावाती खेळी! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकलं द्विशतक
1947 पासून भारतानं ऑस्ट्रेलियात फक्त इतके कसोटी सामने जिंकले, प्रत्येक मालिकेचा निकाल जाणून घ्या
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहित शर्मा या दिवशी ऑस्ट्रेलियात दाखल होणार