मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 311 धावा आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी एक मोठा रेकॉर्ड नोंदल्या गेला आहे. वास्तविक, पहिल्या दिवशी चाहते विक्रमी संख्येनं मेलबर्न क्रिकेट मैदानावर पोहोचले. एबीसी स्पोर्ट्सच्या मते, पहिल्या दिवशी तब्बल 87,242 चाहते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पोहोचले होते. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरलं होतं. एबीसी स्पोर्ट्सनं पोस्ट केलं की बॉक्सिंग डे टेस्टमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीचा हा एक नवीन विक्रम आहे.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासनं पदार्पणात 60 धावा केल्या. तर उस्मान ख्वाजानं 57 धावांचं योगदान दिलं. मार्नस लाबुशेन 72 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टीव्ह स्मिथ 68 धावा करून नाबाद आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहनं शून्यावर बाद केलं. मिचेल मार्श 4 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीनं 31 धावांचं योगदान दिलं.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना बाद केले. त्यानं उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी 1 बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स नाबाद परतले. स्टीव्ह स्मिथ 68 धावा करून खेळत आहे. तर पॅट कमिन्सनं 8 धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 12 धावांची भागीदारी झाली आहे.
हेही वाचा –
स्टीव्ह स्मिथची ब्रॅडमन-पाँटिंगच्या धडाकेबाज लिस्टमध्ये एंट्री, अशी कामगिरी करणारा केवळ चौथाच फलंदाज
कॉन्स्टासला धक्का मारल्यानंतरही विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी का लावली नाही? नियम जाणून घ्या
मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा या क्रमांकावर फलंदाजी करणार, अभिषेक नायरनं स्पष्ट केलं