भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. सध्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.
या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. वास्तविक, भारतीय संघ वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्या रूपानं 2 फिरकीपटूंसह बॉक्सिंग डे कसोटीत उतरू शकतो. तसेच, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त या मालिकेत इतर भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा या कसोटीत मोठ्या बदलांसह उतरू शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. या मालिकेत दोन्ही खेळाडूंनी 1-1 कसोटी खेळली आहे. सुंदर आणि जडेजा हे खालच्या फळीत फलंदाजीही करू शकतात.
केएल राहुल पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालसोबत सलामीवीर म्हणून दिसू शकतो. अशा प्रकारे रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करेल. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलनंतर मधल्या फळीत शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत आणि रोहित शर्मासारखे फलंदाज असतील. तर नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे प्लेइंग 11 मध्ये अष्टपैलू म्हणून दिसू शकतात.
जर मोहम्मद सिराज प्लेइंग 11 मधून बाहेर गेला, तर जसप्रीत बुमराहसोबत फक्त आकाशदीप हा वेगवान गोलंदाज म्हणून दिसेल. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील वेगवान गोलंदाजी करू शकतो, हे विशेष.
चौथ्या कसोटीसाठी भारताची संभांव्य प्लेइंग 11 – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाशदीप
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना 7 वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा, काय आहे प्रकरण?
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 115 धावांनी उडवला धुव्वा! 2-0 ने मालिका खिशात
वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेटपटू बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म