गाबा कसोटीचा दुसरा दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. स्टीव्ह स्मिथनं 535 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. तर गाबा येथे शेवटच्या तीन डावात शून्यावर बाद झालेल्या ट्रॅव्हिस हेडनं 152 धावांची खेळी केली. दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 405 धावा होती. ॲलेक्स कॅरी 45 आणि मिचेल स्टार्क 7 धावांवर नाबाद परतले.
ऑस्ट्रेलियानं कालच्या 28/0 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं पहिला धक्का दिला. नॅथन मॅकस्विनी केवळ 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. उस्मान ख्वाजाही केवळ 21 धावा करू शकला. त्यानंतर मार्नस लाबुशेनही स्वस्तात बाद झाला. त्यानं केवळ 12 धावा केल्या. ख्वाजा आणि मॅकस्विनी यांना बुमराहनं बाद केलं तर लाबुशेनला नितीश रेड्डीनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
75 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 241 धावांची भागीदारी झाली. स्मिथनं सुरुवातीस आपला वेळ घेतला, परंतु एकदा सेट झाल्यावर तो त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. स्मिथनं 29 जून 2023 पासून कसोटीत एकही शतक झळकावलं नव्हतं. त्यानं गाबा येथे शतकाचा दुष्काळ संपवला. स्मिथ 101 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बॅटमधून 12 चौकार आले.
एकीकडे स्मिथनं संयमानं फलंदाजी केली, तर दुसरीकडे ट्रॅव्हिस हेडनं तुफानी फलंदाजी जारी ठेवली. या मैदानावर गेल्या तीन डावात हेड शून्यावर बाद झाला होता, पण आज तो ‘झिरो’ नाही तर ‘हिरो’ ठरला! हेडनं 160 चेंडूत 152 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 18 चौकार आले. हेड आणि स्मिथ या दोघांनाही जसप्रीत बुमराहनं बाद केलं.
एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेटवर 316 धावा होती, पण त्यानंतर बुमराहनं शानदार गोलंदाजी करत 5 विकेट हॉल पूर्ण केला. 327 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर ॲलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. कमिन्स 20 धावा करून बाद झाला. सिराजनं त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. कॅरी एका टोकाकडून वेगानं धावा करत असून तो 47 चेंडूत 45 धावांवर आहे. त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि एक षटकार आला.
जसप्रीत बुमराहनं भारतासाठी पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. त्यानं 72 धावांत 5 विकेट घेतल्या. या मालिकेत त्यानं दुसऱ्यांदा एका डावात 5 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय मोहम्मद सिराजनं एक आणि नितीश कुमार रेड्डीनं एक विकेट घेतली.
हेही वाचा –
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!
स्टीव्ह स्मिथचा कमबॅक, तब्बल इतक्या दिवसांनंतर ठोकलं कसोटी शतक!
‘वन मॅन आर्मी’..! बुम-बुमचा पुन्हा एकदा पंजा, गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी