भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय संघ आपली नियमित जर्सी घालून खेळताना दिसला. मात्र तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू गुलाबी जर्सी घालून मैदानात खेळायला आले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासून गुलाबी जर्सी घालून खेळत आहे. आज टीम इंडियानं असं करण्यामागचं कारण काय आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग, या मागचं कारण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी आपल्या कॅप्सवर स्वाक्षरी करून महान ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅकग्राला भेट दिली. मॅकग्रा त्यांची दिवंगत पत्नी जेन मॅकग्रा यांच्या स्मरणार्थ मॅकग्रा फाऊंडेशन चालवतात, जे स्तनाच्या कर्करोगा (ब्रेस्ट कॅन्सर) विषयी जागरुकता वाढवतात. सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाला ‘पिंक डे’ म्हणतात आणि या दिवशी मॅकग्रा फाउंडेशनसाठी निधी गोळा केला जातो. तसेच वर्षातील पहिल्या कसोटीला ‘पिंक टेस्ट’ असं म्हणतात. या कसोटीसाठी स्टंपचा रंगही गुलाबी केला जातो.
ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय संघ ‘पिंक डे’ला गुलाबी जर्सी घालून खेळत आहे. ग्लेन मॅकग्राची पत्नी जेन मॅकग्रा यांचं 22 जून 2008 रोजी निधन झालं होतं. त्यापूर्वी 3 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजानं ‘मॅकग्रा संस्थेची’ स्थापना केली होती.
सिडनी कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियानं पहिल्या डावात 4 धावांची मामुली आघाडी घेतली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव 157 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारतानं चौथ्या डावात कांगारू संघाला 162 धावांचं लक्ष्य दिलं आहे. रिषभ पंतनं भारताकडून शानदार 61 धावांची खेळी केली.
हेही वाचा –
विराटने मैदानावर केली ऑस्ट्रेलियन चाहत्यांची बोलती बंद, सँडपेपर घटना पुन्हा चर्चेत; VIDEO पाहा
IND vs AUS; “रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाला हादरून सोडले” महान खेळाडूने केले कौतुक
भारतीय खेळाडूंनी सॅम कोन्स्टासला धमकावले, प्रशिक्षकाने केला मोठा आरोप