भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाची विस्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौरने या सामन्यातून माघार घेतली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक समेश पवार यांनी याविषयी माहिती दिली आहे.
त्यांनी हरमनप्रीतच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे सांगितले आहे आणि याच कारणास्तव ती पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहभागी होणार नाही.
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकमेव कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार होती, पण काही कारणास्तव हा सामना पुढे ढकलण्यात आला आणि आता हा सामना २१ सप्टेंबरला खेळला जाणार आहे.
भारतीय संघाला या दौऱ्यावर एक ऐतिहासिक कसोटी सामनाही खेळायचा आहे. हा सामना ऐतिहासिक यासाठी ठरतो की, हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. कसोटी सामना ३० सप्टेंबरपासून ३ ऑक्टोंबरपर्यंत खेळला जाणार आहे.
हरमनप्रीतच्या अंगठ्याला झाली दुखापत
भारतीय महिला एकदिवसीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तिने सामन्यातून माघार घेतल्यामुळे संघाच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. तिने मालिकेआधी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही सहभाग घेतला नव्हता.
संघाचे मुख्य प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच तिच्या आंगठ्याला दुखापत झाली होती. ती अजून पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही आणि त्यामुळेच ती पहिल्या सामन्यात भाग घेणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, ती फिट झाली की, तिला सामन्यात संधी दिली जाईल. हरमनप्रीतव्यतिरिक्त संघाचे अन्य सर्व खेळाडू निवडप्रक्रियेसाठी उपलब्ध असतील.
सराव सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने केला पराभव
भारतीय संघाने सराव सामन्याने दौऱ्याला सुरुवात केली आणि ती काही चांगली ठरली नाही. हा सामना शनिवारी(१८ सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ३६ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण भारतय संघ २४२ धावांपर्यंतच पोहचू शकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ कोहलीसाठी आजचा दिवस असेल खास, ‘या’ दोन मोठ्या विक्रामांवर असेल नजर