भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबरपासून खेळला जाईल. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करत १-० ने आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याची स्तुती केली. अश्विनकडून भरपूर शिकायला मिळाले असल्याचेही लायनने म्हटले.
अश्विन जागतिक किर्तीचा गोलंदाज
पहिल्या कसोटी सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करणारा लायन दुसऱ्या कसोटीपूर्वी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला सामोरे गेला. त्यामध्ये बोलताना लायन म्हणाला, “अश्विन एक जागतिक किर्तीचा गोलंदाज आहे. मी त्याला खूप पहिल्यापासून गोलंदाजी करताना पाहत आलोय. भारत दौऱ्यावर असताना मी त्याचे अनेकदा निरीक्षण केले होते. मी अश्विनकडून कायम शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या गोलंदाजीमध्ये भरपूर विविधता आहे. तो गोलंदाजी करताना अत्यंत चलाखीने चेंडूचा वेग बदलतो. आम्ही दोघे एकसारखे गोलंदाज आहोतही आणि नाहीसुद्धा. त्यामुळे आमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. त्याची आकडेवारी तो कसा गोलंदाज आहे हे दर्शवते.”
४०० बळी महत्त्वाचे
लायन ४०० कसोटी बळी मिळवण्याच्या अगदी जवळ आहे. याबाबत त्याला विचारले की, तुला कोणत्या खास फलंदाजाला ४०० वा बळी म्हणून बाद करायला आवडेल? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “मी त्याबाबत जास्त विचार करत नाही. माझा ४०० वा बळी मयंक अगरवाल असो नाहीतर जसप्रीत बुमराह असो, माझ्यासाठी ४०० बळी महत्त्वाचे आहेत.
लायनच्या नावे आहेत ३९१ कसोटी बळी
अश्विन आणि लायन सध्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहेत. अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ७२ कसोटीत ३७० बळी मिळवले आहेत, तर दुसरीकडे लायनने ९७ कसोटी सामने खेळत ३९१ फलंदाजांची शिकार केली आहे. दिग्गज शेन वॉर्ननंतर ४०० कसोटी बळी मिळवणारा तो ऑस्ट्रेलियन फिरकीपटू बनू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”
‘तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे’, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश
कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडची चिंता पुन्हा वाढली; ‘या’ दौर्याबद्दल आली मोठी माहिती समोर