भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर टी२० मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातो आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८६ धावा फटकावल्या आहेत. भारताला मालिका ‘क्लिन स्विप’ करण्यासाठी १८७ धावांचे आव्हान पार करावे लागेल.
ऑस्ट्रेलियाची शानदार फलंदाजी
मालिकेतील ‘क्लिन स्वीप’ टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करताना १८६ धावा धावफलकावर लावल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर-यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने सर्वाधिक ८० धावा फटकावल्या. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक ५४ धावांचे योगदान दिले. भारताकडून वाशिंग्टन सुंदरने दोन तर युजवेंद्र चहल आणी टी नटराजनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताला बसला पहिला धक्का
ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष पार करताना भारताकडून केएल राहुल व मागील सामन्यात अर्धशतक झळकावलेला शिखर धवन हे सलामीवीर मैदानात उतरले. भारतीय डावाच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मॅक्सवेलने राहुलला स्टीव स्मिथकरवी झेलबाद ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली ही जोडी जमली. दोघांनीही काही लाजवाब फटके खेळत भारताची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विराटला यादरम्यान तीन जीवदाने मिळाली.
दहा षटकांनंतर भारत मजबूत स्थितीत
धवन-विराटही जोडी भारताचा डाव वेगाने पुढे नेत असताना, नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन याला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात धवनने डॅनियल सॅम्सच्या हाती झेल सोपवला. सॅम्सने डाव्या हातावर झेप घेत हा अफलातून झेल पकडला. धवनने २८ धावांचे योगदान दिले. दहा षटकांच्या समाप्तीनंतर भारताने २ बाद ८१ धावा केल्या आहेत. विराट ४४ तर संजू सॅमसन ३ धावांवर नाबाद आहेत. भारताला जिंकण्यासाठी आणखी १०६ धावांची आवश्यकता आहे.
भारतीय संघाने वनडे मालिकेत पराभव पत्करल्यानंतर टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सलग तिसरा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करण्याची नामी संधी भारतीय संघाकडे असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आपला सन्मान वाचण्यासाठी खेळेल.
संबंधित बातम्या:
– Aus vs Ind Live: नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा गोलंदाजीचा निर्णय: ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या खेळाडूचे पुनरागमन
– विराटला बेसबॉलच्या रूपात पाहिलंय का? मेजर बेसबॉल लीगने केला मजेशीर फोटो शेअर
– भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर