भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात असलेला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. पावसामुळे गेले दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता. मात्र आज चौथ्या दिवशी पूर्ण खेळ झाला. त्यामुळे आता या सामन्यात निकालाची अपेक्षा आहे.
सोमवारी (30 सप्टेंबर), बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. याच्या प्रत्युत्तरात, टीम इंडियानं आक्रमक फलंदाजी करत 285 धावा फलकावर लावल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं त्यांच्या दुसऱ्या डावात 26/2 धावा केल्या आहेत. ते टीम इंडियाच्या पहिल्या डावातील आघाडीपासून अजूनही 26 धावा मागे आहेत. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे.
आज चौथ्या दिवशी बांगलादेशनं 107/3 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. 112 धावांवर संघाला चौथा धक्का बसला. मुशफिकर रहीम 32 चेंडूत 11 धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर बोल्ड झाला. लिटन दासनं (13) काही चांगले शॉट्स खेळले, पण नंतर तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. रोहितनं त्याचा हवेत उडी मारून एका हातानं जबरदस्त झेल घेतला. अनुभवी शाकिब अल हसनही फारशी कमाल करू शकला नाही. तो 9 धावा करून तंबूत परतला. एकीकडे विकेट्स पडत असताना मोमिनुल हकनं दुसऱ्या टोकानं शानदार फलंदाजी केली. त्यानं 107 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन बळी घेतले.
प्र्त्युत्तरात, भारताच्या डावाची झंझावाती सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जयस्वालने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केलं होतं. दोघांमध्ये 55 धावांची भागीदारी झाली. रोहितनं 11 चेंडूत 23 धावा केल्या, तर यशस्वी जयस्वालनं 51 चेंडूत 72 धावा ठोकल्या. हे दोघं बाद झाल्यानंतरही भारतानं आपला वेग कमी केला नाही.
शुबमन गिलनं 36 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं तर विराट कोहलीनं 35 चेंडूत 47 धावा केल्या. यानंतर केएल राहुलनं मोर्चा सांभाळला. त्यानं स्फोटक फलंदाजी करत 43 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 67 धावा केल्या. अशाप्रकारे भारतानं आपल्या डावात 34.4 षटकं खेळून 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी मिळवली. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि शकिब अल हसन यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
टीम इंडियानं 9 विकेट पडताच पहिला डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. याचा फायदा भारताला झाला. बांगलादेशनं दुसऱ्या डावात 11 षटकांच्या खेळात 2 गडी गमावून 26 धावांपर्यंत मजल मारली. झाकीर हसन 10 धावा आणि हसन महमूद 4 धावा करून बाद झाला. अश्विननं या दोघांचे बळी घेतले. सध्या शदमान इस्लाम (7) आणि मोमिनुल हक (0) क्रिजवर आहेत.
हेही वाचा –
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं
एकमेव, अद्वितीय किंग कोहली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, क्रिकेटच्या देवालाही मागे टाकलं!
22 वर्षीय यशस्वीची धमाल! सेहवागचा 16 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त