दिल्ली। आजपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
सामन्यापूर्वी भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) भारतीय संघातील क्रिकेटपटूंना बांगलादेश संघाला कमजोर समजण्याची चूक करु नका असे सांगितले आहे.
रोहित म्हणाला की, ‘बांगलादेशचा संघ चांगला आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी मायदेशाबरोबर परदेशातही खेळताना त्यांच्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. विशेषत: आमच्या विरुद्ध, त्यांनी भारतीय संघाला नेहमीच दबावाखाली ठेवले आहे. त्यामुळे या संघाला कमजोर समजण्याची चूक करुन चालणार नाही.’
‘मी समजू शकतो त्यांच्या संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू तमीम इक्बाल आणि अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन आता संघात नाहीत. पण ते जरी संघात नसले तरी त्यांच्या संघात एखाद्या दिवशी कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. ते आता परिपक्व क्रिकेटपटू झाले आहेत. हे खेळाडू बऱ्याच काळापासून खेळत आहेत.’
तमीम त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे संघातून बाहेर आहे तर शाकिब अल हसनवर आयसीसीकडून बंदी घालण्यात आली आहे.
तसेच रोहित पुढे म्हणाला, ‘बांगलादेश संघात बरेच युवा खेळाडू आहेत. परंतु, आमच्यासाठी प्रतिस्पर्धी संघावर एवढे लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. आमच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे एक संघ म्हणून आपण काय करू शकतो? भारतीय संघातही बरेच युवा खेळाडू आहेत जे संघासाठी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वाट पाहत आहेत.’