दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात आजपासून(3 नोव्हेंबर) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये होत असलेल्या या टी20 मालिकेत भारताला फिरकीपटू युजवेंद्र चहलला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने जर या टी20 मालिकेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार करेल. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार करणारा आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह नंतरचा केवळ तिसराच भारतीय गोलंदाज ठरेल.
सध्या भारताकडून केवळ अश्विन आणि बुमराहनेच टी20 मध्ये 50 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 46 सामन्यात 52 आणि बुमराहने 42 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत.
चहलने सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 31 सामन्यात खेळताना 46 विकेट्स घेतल्या आहेत.
चहलला आज जर बांगलादेश विरुद्धच्या टी20 सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली तर तो 8 महिन्यांनी भारताच्या टी20 संघातून खेळेल. त्याला याआधी वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या भारताच्या टी20 मालिकांमध्ये संधी मिळाली नव्हती.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
52 विकेट्स – आर अश्विन
51 विकेट्स – जसप्रीत बुमराह
46 विकेट्स – युजवेंद्र चहल
39 विकेट्स – भुवनेश्वर कुमार
38 विकेट्स – हार्दिक पंड्या






