भारतीय क्रिकेट संघानं ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकांत केवळ 127 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं हे लक्ष्य केवळ 11.5 षटकांत 3 गडी गमावून गाठलं. भारताकडून हार्दिक पांड्या, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली. या मोठ्या विजयासह टीम इंडियानं अनेक विक्रमही आपल्या नावे केले.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांचा पाठलाग करताना चेंडू शिल्लक असताना भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्धचा सामना भारतानं 49 चेंडू शिल्लक असताना जिंकला. यापूर्वी भारतानं 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 41 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता. तेव्हा संघ 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्याआधी 2010 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं 31 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता.
याशिवाय या सामन्यात आणखी एक मोठा विक्रमही झाला. सुपर ओव्हरसह टी20 आंतरराष्ट्रीय मधील भारताचा हा सलग 12 वा विजय आहे. यापूर्वी, नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत भारतानं सलग 12 सामने जिंकले होते. आता टीम इंडियाने पुढचा सामना जिंकला तर हा विक्रम आणखी सुधारेल.
पॉवर प्लेमध्येही भारतानं मोठा विक्रम केला. टीम इंडियानं पॉवरप्लेमध्ये 71 धावा केल्या, जी बांगलादेशविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 68 धावा केल्या होत्या.
भारतीय संघानं मालिकेतील पहिला सामना शानदारपणे जिंकला. आता याच पद्धतीनं दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
हेही वाचा –
INDW vs PAKW; हरमनप्रीत कौरच्या दुखापतीबद्दल स्म्रीती मानधनाची प्रतिक्रिया
“धर्मानंतर क्रिकेट पुढे…” प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार
IND vs PAK; भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून शानदार विजय