भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतून भारतीय संघाला तब्बल 10 वर्षांनंतर झहीर खानची रिप्लेसमेंट मिळू शकते. यासाठी कर्णधार रोहित शर्माला एका युवा गोलंदाजाला संधी द्यावी लागेल. या गोलंदाजाचं नाव आहे यश दयाल.
यश दयाल जर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी देखील निवड होऊ शकते. अशाप्रकारे त्याच्यासाठी बॉर्डर-गावस्कर मालिकेचे दरवाजे देखील उघडू शकतात. बीसीसीआयनं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ज्या 16 खेळाडूंची निवड केली, त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि आकाशदीप सिंग हे 4 वेगवान गोलंदाज आहेत.
विस्डेननुसार, 1945 च्या दुसऱ्या महायुद्धानंतर एकूण 349 वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी 20 डावांत गोलंदाजी केली. मात्र त्यापैकी फक्त 49 गोलंदाज डावखुरे होते. या दरम्यान भारताच्या 29 वेगवान गोलंदाजांपैकी केवळ 6 डावखुरे होते. यापैकी रुसी सुरती आणि करसन घावरी यांनी अनुक्रमे 1960 आणि 1970 च्या दशकात 42 व 109 विकेट घेतल्या.
यानंतर पुढील 20 वर्ष भारतात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ पाहायला मिळाला. अखेर 21व्या शतकाच्या सुरुवातीला आशिष नेहरा (1999), झहीर खान (2000), इरफान पठान (2003) आणि आरपी सिंह (2006) यांनी पदार्पण केलं. यापैकी झहीर खानची कसोटी कारकीर्द सर्वात मोठी राहिली. त्यानं 92 कसोटी सामने खेळले, ज्यात 311 विकेट घेतल्या. याशिवाय इरफान पठाननं 29 कसोटीत 100 बळी घेतले. आशिष नेहरानं 1999 ते 2004 दरम्यान 17 कसोटी खेळल्या, ज्यात त्यानं 44 विकेट घेतल्या. आरपी सिंहची कारकीर्द छोटी राहिली. त्यानं 14 कसोटीत 40 विकेट घेतल्या.
2014 मध्ये झहीर खानच्या निवृत्तीनंतर 10 वर्षांत भारताकडून डावखुऱ्या गोलंदाजांनी केवळ 4 कसोटीत गोलंदाजी केली. यापैकी जयदेव उनाडकटनं 3 सामने खेळले, तर टी नटराजनला 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र हे दोघेही दीर्घकाळ भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.
आता टीम इंडियात डावखुऱ्या यश दयालला संधी मिळाली आहे, जो केवळ 26 वर्षांचा आहे. तो भारतीय संघात दीर्घकाळ खेळू शकतो. त्याला फक्त नियमित संधी मिळण्याची आवश्यकता आहे. यश दयालच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 24 सामन्यांत 76 विकेट घेतल्या आहेत. यश दयालनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक अर्धशतकही ठोकलं आहे.
हेही वाचा –
3 क्रिकेटपटू ज्यांना न्यूझीलंड मालिकेसाठी मिळू शकते संधी; देशांतर्गत क्रिकेटमध्ये कहर कामगिरी
विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला, ‘मी चांगला क्रिकेटर होतो, पण…’, बड्या नेत्याचा मोठा खुलासा
प्रमुख कसोटी मालिकेतून भारतीय खेळाडू बाहेर, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून पुनरागमन करणार!