इंग्लंड विरूद्ध भारत कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय संघाच्या पदरी निराशा आली. भारतीय संघ विजयापासून काही अंतरच दूर होता. पाचव्या दिवशी संघाला विजयासाठी केवळ 157 धावांची आवश्यकता होती आणि संघाचे 9 खेळाडू खेळायचे बाकी होते. मात्र नाॅटिंघममधील पावसामूळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. परिणामी सामन्याचा निकाल लागला नाही. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने निराशा व्यक्त केली आहे.
विराट कोहली म्हणाला, “आम्ही विचार करत होतो की, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडेल. पण पाचव्या दिवशी जेव्हा आम्ही आव्हान गाठणार होतो, तेव्हा अशा परिस्थितीची कल्पना नव्हती. आम्हाला मजबूत सुरूवात करायची होती आणि पाचव्या दिवशी आमच्याकडे पूर्ण संधी होती. आम्ही या सामन्यात चांगल्या स्थितीत होतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, पाचव्या दिवशी एकही चेंडू खेळला गेला नाही. आम्ही चौथ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत 50 धावा केल्या होत्या, जी आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट होती. आम्ही फलंदाजीसाठी प्रतिकूल मैदान असूनही बचावात्मक खेळी न खेळता खराब चेंडू मिळताच सीमारेषेच्या बाहेर लावत होतो.”
खालच्या फळीतील फलंदाजांवर खुश आहे विराट
विराटने सामन्यानंतर संघातील खालच्या फळीतील फलंदाजांचेही कौतूक केले आहे. तो म्हणाला, “आमच्या फलंदाजांनी नेट्समध्ये फलंदाजीचा चांगला सराव केला आहे. मुळात खालच्या फळीतील फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळेच आम्ही पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळवू शकलो. मला वाटते की, त्यांनी फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले आहे. हे मागील तीन आठवड्यातील केलेल्या कठोर प्रयत्नांचे फळ आहे.”
“कसोटी मालिकेत पुढेही 4-1 चे संयोजन राहू शकते. पण, परिस्थीतीप्रमाणे त्यात बदल होतील. इंग्लंडसोबतची कसोटी मालिका नेहमीप्रमाणे रोमांचक होईल. जसे नेहमी भारत-इंग्लंड मालिका होते,” असे विराटने शेवटी म्हटले.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर रोखले होते. त्यानंतर इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना 278 धावा करत भारताने पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 303 धावांवर गुंडाळले आणि भारतीय संघाला 209 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाअखेर भारताने 1 गडी गमावून 52 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी फक्त 157 धावांची गरज होती. पण पावसाने भारतीय संघाच्या आशा पाण्यात मिळवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध ९ विकेट्स घेऊनही बुमराहला का मिळाला सामनावीर पुरस्कार? घ्या जाणून
भारीच की! रुट जेव्हा ‘अशी’ कामगिरी करतो, तेव्हा इंग्लंड कधीच पराभूत होत नाही, वाचा सविस्तर
WTC फायनलमध्ये अपयश येऊनही गोलंदाजीत फारसा बदल नाही, पण ‘या’ गोष्टीत मात्र बदल केला, बुमराहचा खुलासा