भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडियानं आधीच मालिका 3-1 ने खिशात घातली असल्यानं इंग्लंडसाठी हा सामना सन्मानाची लढाई आहे. मात्र भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता साहेबांसाठी हा सामना जिंकणं हे मोठं आव्हान असेल.
या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, या सामन्यावर पावसाचं सावट असून, सामना पावसामुळे वाहून गेल्यास इंग्लंडचा आणखी एक पराभव टळू शकतो. गेल्या तीन सामन्यांप्रमाणेच धरमशालाची खेळपट्टीही संथ असू शकते, त्यामुळे या सामन्यात इंग्लंडच्या विजयाची शक्यता तशी फारच कमी आहे. (Ind Vs Eng test weather)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवार (7 मार्च) आणि शुक्रवार (8 मार्च) धरमशाला जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल. तसेच हलका पाऊसही पडू शकतो. शनिवारी आणि रविवारी (९-10 मार्च) ढगाळ वातावरण निवळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यानंतर 11 मार्चला पुन्हा पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या पाचही दिवशी तापमान 17-18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तर रात्रीचं किमान तापमान 5-6 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
सामन्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 7 मार्चला सर्वाधिक (82 %) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 8 मार्च (३ %), 9 मार्च (0 %), 10 मार्च (0 %) आणि 11 मार्च (3 %) पावसाची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 25-29 जानेवारी दरम्यान हैदराबाद येथे पहिली कसोटी झाली. या सामन्यात इंग्लंडनं 28 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 2-6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे दुसरी कसोटी खेळली गेली. या कसोटीत भारतीय संघानं 106 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केलं. तिसरी कसोटी 15-19 फेब्रुवारी दरम्यान राजकोट येथे खेळली गेली. या कसोटीत भारतानं ४३४ धावांनी विक्रमी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. रांची येथे 23-27 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या चौथ्या कसोटीत भारतानं 5 गडी राखून मिळवला आणि मालिकेत 3-1 अशी विजय आघाडी घेतली. आता पाचवी कसोटी 7-11 मार्च दरम्यान धरमशाला येथे खेळली जाणार आहे.
5व्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सरफराज खान, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
महत्त्वाच्या बातम्या-
‘झहीर-धोनीही 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु…’; आर अश्विनचा मोठा दावा
इंग्लंड कसोटीपूर्वी भारतीय फिरकीपटूचा मोठा निर्णय! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला ठोकला रामराम
न्यूझीलंडच्या दिग्गजावर निवृत्तीसाठी बळजबरी! माजी कर्णधाराचा मोठा दावा