गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. उभय संघांतील हा सामना एडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जाणार असून इंग्लंड संघ दबावात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारणही तसेच आहे. विराट कोहली सध्या भारतीय संघासाठी जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. अशात एडिलेड ओव्हल म्हणजे त्याचे आवडेत मैदान. याठिकाणी त्याची आकडेवारी असामान्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
विराट कोहली (Virat Kohli) आशिया चषक 2022 पूर्वी धावा करण्यासाठी झगडताना दिसत होता. पण मध्यंतरी त्याने मोठी विश्रांती घेतली आणि मैदानात पुनरागमन केल्यानंतर त्याला सूर गवसल्याचे दिसत आहे. टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) दरम्यान तो पूर्ण लयीत परतला आहे आणि विरोधी संघासाठी सर्वात मोठी बाधा देखील ठरत आहे. विराटची एडिलेड ओव्हव (Adelaide Oval) मैदानावरील आकडेवारी पाहिली, तर इंग्लंड संघाची चिंता नक्कीच वाढू शकते. विराट याठिकाणी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकदाही बाद झाला नाहीये. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक देखील याच ठिकाणी केले होते.
चालू टी-20 विश्वचषकात भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना देखील याच मैदानावर जिंकला आहे. विराट कोहली या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करू शकला आणि संघाच्या विजयात त्याचे योगदान महत्वाचे होते. या मैदानात त्याची एकंदरीत आकडेवारी पाहिली, तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने याठिकाणी एकूण 10 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 907 धावा निघाल्या. यादरम्यान विराटने पाच शतके केली आणि त्याची सरासरी 75.58 राहिली. एडिलेडमध्ये विराट आतापर्यंत दोन सामने खेळले आहे आणि दोन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला आहे.
विराटने 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध याठिकाणी पहिला टी-20 सामना खेळला होता आणि नाबाद 90 धावांची खेळी केली होती. त्यानंतर यावर्षी बांगलादेशविरुद्ध खेळताना याठिकाणी त्याने नाबाद 64 धावा कुटल्या. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात देखील विराट या मैदानात अशीच मोठी खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. या सामन्यातील त्याच्या प्रदर्शनावर अनेकांच्या नजरा टिकून आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे सूर्याबाबत वक्तव्य! म्हणाले, ‘मी असतो तर सूर्यकुमार यादवसारख्या सर्व फलंदाजांना संघात…’
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे ‘बॉस’ लावणार हजेरी, गांगुलीचाही असू शकतो समावेश