टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने खिशात घातली. भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग 17वी कसोटी मालिका जिंकली आहे. तर ब्रेंडन मॅक्क्युलम प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स कर्णधार बनल्यानंतर इंग्लंडचा हा पहिलाच मालिका पराभव ठरला.
या मालिकेत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर रोहित ब्रिगेडनं जोरदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले. यासह भारतीय संघानं इंग्लंडच्या बहुचर्चित ‘बॅझबॉल’ रणनीतीचा पार धुव्वा उडवला. फलंदाजी असो की गोलंदाजी, भारतीय खेळाडूंनी प्रत्येक विभागात इंग्रजांचा पराभव केला. टीम इंडियाच्या या संस्मरणीय कामगिरीमध्ये सहा खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
1. यशस्वी जयस्वाल – या मालिकेत ‘बॅझबॉल’ला यशस्वी जयस्वालच्या ‘जॅसबॉल’नं उत्तर मिळालं. यशस्वीनं संपूर्ण मालिकेत अत्यंत आक्रमक शैलीत फलंदाजी केली. या मालिकेत यशस्वीने एकूण 9 डावांमध्ये सर्वाधिक 712 धावा केल्या. यात दोन द्विशतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान यशस्वीचा स्ट्राइक रेट 79.91 आणि सरासरी 89 एवढी राहिली. मालिकेत यशस्वीनं 68 चौकार आणि तब्बल 26 षटकार मारले. 22 वर्षीय यशस्वीनं विशाखापट्टणम कसोटीत 209 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर राजकोट कसोटीतही या युवा खेळाडूनं भारताच्या दुसऱ्या डावात 214 धावा केल्या. त्यानंतर रांची आणि धरमशाला कसोटी सामन्यांमध्येही यशस्वीची कामगिरी उत्कृष्ट राहिली. या चमकदार कामगिरीमुळे यशस्वीची ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली.
2. रोहित शर्मा – टीम इंडियाच्या विजयात कर्णधार रोहित शर्मानं खूप महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधारपदासोबतच रोहितनं फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. रोहितनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 44.44 च्या सरासरीनं 400 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकलं. राजकोट कसोटीत भारत पहिल्या तासात तीन विकेट्स गमावून अडचणीत सापडला होता, मात्र रोहितनं शतक झळकावून संघाला सावरलं.
3. कुलदीप यादव – कुलदीप यादव हा एक गोलंदाज आहे. मात्र या मालिकेत त्यानं चेंडूसोबतच बॅटनंही चांगली कामगिरी केली. कुलदीपनं 8 डावात 20.15 च्या सरासरीनं 19 बळी घेतले. फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर कुलदीपनं या मालिकेत सहा डावांत एकूण 362 चेंडू खेळून 97 धावा केल्या. हैदराबाद कसोटी सामन्यात कुलदीपला संधी मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर त्यानं मिळालेल्या संधींचं सोनं केलं. धरमशाला कसोटीत तो ‘मॅन ऑफ द मॅच’ राहिला.
4. रविचंद्रन अश्विन – अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं धरमशाला येथे आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना खेळला. अश्विन या मालिकेतील विजयाचा नायक होता. अश्विननं 10 डावात 24.80 च्या सरासरीनं सर्वाधिक 26 विकेट घेतल्या. यादरम्यान अश्विननं दोन वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या. 37 वर्षीय अश्विननं फलंदाजी करत सात डावात 116 धावा केल्या.
5. शुबमन गिल – सलामीवीर यशस्वी जयस्वालनंतर शुबमन गिलनं या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. या मालिकेत त्यानं संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. गिलनं मालिकेतील 5 सामन्यात 452 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 56.5 होती. गिलनं धरमशाला आणि विशाखापट्टणम कसोटीत शतकं झळकावली.
6. रवींद्र जडेजा – डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजानंही टीम इंडियाच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जडेजानं बॉल आणि बॅटद्वारे चमकदार कामगिरी केली. जडेजानं 6 डावात 38.66 च्या सरासरीनं 232 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर जडेजानं सहा डावात 25.05 च्या सरासरीनं 19 बळी घेतले.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल
पहिली कसोटी – 29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजयी)
दुसरी कसोटी – 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत 106 धावांनी विजयी)
तिसरी कसोटी – 15-19 फेब्रुवारी, राजकोट (भारत ४३४ धावांनी विजयी)
चौथी कसोटी – 23-27 फेब्रुवारी, रांची (भारत 5 गडी राखून विजयी)
पाचवी कसोटी – 7-11 मार्च, धरमशाला (भारत एक डाव आणि 64 धावांनी विजयी)
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक