विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) यशस्वी जयस्वाल याची बॅट चांगलीच चालली. सलामीवीर रोहित शर्मा जयस्वालची साथ देऊ शकला नाही. पण जयस्वालने आपला खेळ दुसऱ्या बाजूने सुरू ठेवला आणि शतक पूर्ण केले. यादरम्यान शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी त्याची साथ दिली.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. रोहित याही सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने 41 चेंडूत 14 धांवांवर युवा शोएब बशीर याला विकेट सोपवली. पण जयस्वालने आपली बॅट आणि विरोधी संघांच्या गोलंदाजांना नियंत्रणात ठेवले. परिणामी सलामीवीर फलंदाज आपले दुसरे कसोटी शतक पूर्ण करू शकले. त्याने 151 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 100 धावांचा टप्पा पार केला. शतक पूर्ण करण्यासाठी त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार देखील मारला.
यशस्वी जयस्वाल मायदेशात कसोटी शतक करणारा दुसरा सर्वात युवा सलामीवीर ठरला आहे. यादीत पहिला क्रमांक पृथ्वी शॉ याचा आहे. शॉ याचे वय 18 वर्ष 329 दिवस असताना वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने शतके केले होते. 2018 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. शुक्रवारी जयस्वालने वयाच्या 23 व्या वर्षी (22 वर्ष 36 दिवस) इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले.
मायदेशात कसोटी शतक करणारे भारताचे सर्वात युवा सलामीवीर फलंदाज
पृथ्वी शॉ – 18 वर्ष 329 दिवस विरुद्ध वेस्ट इंडीज (2018)
यशस्वी जयस्वाल – 22 वर्ष 36 दिवस विरुद्ध इंग्लंड (2024)
मोटगनहल्ली जयसिंह – 22 वर्ष 285 दिवस विरुद्ध इंग्लंड (1961)
शिव सुंदर दास – 23 वर्ष 20 दिवस विरुद्ध झिम्बाब्वे (2000)
शुबमन गिल – 23 वर्ष 197 दिवस विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)
शुबमन गिल याने 46 चेंडूत 34 धावा करून विकेट गमावली. तर श्रेयस अय्यर याने 59 चेंडूत 27 धावा करून विकेट गमावली. अय्यर आणि जयस्वाल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी देखील पार पडली.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । मैदानात पाय टाकताच अँडरसनच्या नावावर मोठा विक्रम, 29 वर्षांनंतर घडला ‘हा’ पराक्रम
राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश संघाला विजेतेपद, पुरूष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघ अव्वल स्थानी