---Advertisement---

ज्यूनियर हॉकी विश्वचषक: पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 12:56 AM
---Advertisement---

एफआयएच ज्यूनियर पुरुष हॉकी विश्वचषक २०२१ मध्ये भारताची सुरुवात खराब झाली आहे. गतविजेत्या भारताला पहिल्याच गट सामन्यात फ्रान्सकडून ४-५ असा पराभव पत्करावा लागला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या गट-बी सामन्यात फ्रान्सचा कर्णधार टिमोथी क्लेमनने शानदार हॅट्रिक करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याचवेळी ड्रॅग फ्लिकर संजय सिंगनेही भारतासाठी ३ गोल केले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

फ्रान्सने पहिल्याच मिनिटालाच आघाडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी सातव्या मिनिटाला दुसरा गोल केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने दोन गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. मात्र, यानंतर फ्रान्सने वर्चस्व राखले आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला फ्रेंच संघाने प्रत्येकी एक गोल करत ५-२ अशी आघाडी घेतली. भारताने शेवटच्या ४ मिनिटांत दोन गोल करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. भारताचा पुढील सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कॅनडाशी होणार आहे.

भारत आणि फ्रान्स ज्यूनियर विश्वचषकात फक्त दोनदाच एकमेकांविरुद्ध खेळले होते आणि दोन्ही वेळा भारतीय संघ जिंकला होता. या दोन्ही सामन्यात भारताने फ्रान्सविरुद्ध आठ गोल केले होते. तर फ्रान्स संघाला केवळ एक वेळा भारतीय संघाचा गोल पोस्टला भेदण्यात यश आले होते. मात्र, भुवनेश्वर येथे झालेल्या या सामन्यात फ्रान्सने इतिहास बदलला आहे.

भारतीय ज्यूनियर संघाच्या नजरा तिसऱ्या विश्वचषकाच्या विजेतेपदावर आहेत. भारताने पहिल्यांदा २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे ज्यूनियर हॉकी विश्वचषक जिंकला होता आणि त्यानंतर २०१६ मध्ये लखनऊ येथे विजेतेपद पटकावले होते. जर्मनीने सहा वेळा आणि भारताने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा हे विजेतेपद पटकावले आहे.

भारतीय संघ
विवेक सागर प्रसाद (कर्णधार), प्रशांत चौहान (गोलकीपर), संजय, शारदानंद तिवारी, अभिषेक लाक्रा, यशदीप सिवाच, गुरुमुख सिंग, अरिजित सिंग हुंडल, मनिंदर सिंग, उत्तम सिंग आणि विष्णुकांत सिंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---