---Advertisement---

Video: सिंग इज किंग! संघात परतताच अर्शदीपची कमाल, चौथ्याच चेंडूवर घेतली विकेट

On: रविवार, जानेवारी 18, 2026 1:56 PM
Arshdeep-Singh
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना आज (रविवारी, १८ जानेवारी) इंदौर येथे खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संघात पहिल्या दोन्ही सामन्यात बाकावर बसलेल्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची अंतिम अकरामध्ये निवड करण्यात आली.

अंतिम अकरामध्ये स्थान मिळताच अर्शदीपने तो भारताचा एक महत्वाचा खेळाडू आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असून भारताकडून पहिले षटक अर्शदीपने टाकले. त्याने चौथ्याच चेंडूवर हेन्री निकल्सला त्रिफळाचीत केले आहे. निकल्स पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याआधी अर्शदीपला डेवॉन कॉनवेने चौकार मारला होता. यामुळे त्याने पहिल्या षटकात ५ धावा देत एक विकेट काढत चांगले पुनरागमन केले आहे.

अर्शदीपनंतर आणखी एक वेगवान गोलंदाज हर्षित राणा यानेही संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्यानेही त्याच्या पहिल्याच षटकात कॉनवेची विकेट काढली. तो ४ चेंडूत ५ धावा करत बाद झाला. त्याचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला. यामुळे न्यूझीलंड संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात विकेट्स गमावून बसले आहेत. तसेच हर्षितने या मालिकेमध्ये तिन्ही वेळा कॉनवेची विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. वडोदरा येथे झालेला पहिला सामना भारताने ४ विकेट्सने तर राजकोट येथे झालेला दुसरा सामना न्यूझीलंडने ७ विकेट्सने जिंकला आहे. यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली असून आजचा सामना दोन्ही संघासाठी जिंकणे आवश्यक आहे.

वनडे मालिकेनंतर दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना २१ जानेवारीला नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठीही अर्शदीप आणि हर्षित यांची संघात निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---