न्यूझीलंडनं बंगळुरू कसोटी सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402 धावा केल्या. अशा प्रकारे किवी संघानं 356 धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडकडून युवा फलंदाज रचिन रवींद्रनं शानदार शतक झळकावलं. त्यानं 134 धावांची दमदार खेळी खेळली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीचं दुसरं शतक ठरलं. न्यूझीलंडसाठी बाद होणारा तो शेवटचा फलंदाज ठरला. त्याच्याशिवाय टीम साऊदी आणि डेव्हॉन कॉनवे यांनीही अर्धशतकं झळकावले.
बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसानं वाहून गेला होता. त्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतावरच उलटला. पहिल्या डावात टीम इंडिया 46 धावांवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडनं 3 बाद 180 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराजनं सर्वप्रथम डॅरिल मिशेलला बाद केलं. त्यानंतर त्यांच्या नियमित अंतरानं विकेट पडत गेल्या. एकवेळ न्यूझीलंडची धावसंख्या 7 विकेटवर 233 धावा झाली होती. दरम्या रचिन रवींद्रनं 124 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानं टीम साऊदीसोबत 137 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. रवींद्र आणि साऊदीनं मिळून संघाची धावसंख्या 350 धावांच्या पुढे नेली.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्सच्या विकेट्स झटपट काढल्या. परंतु न्यूझीलंडच्या शेवटच्या तीन गड्यांनी मिळून 169 धावा केल्या. भारतासाठी कुलदीप यादवनं तीन विकेट घेतल्या. पण त्यानंही 5 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या. रवींद्र जडेजानेही 3 तर मोहम्मद सिराजनं 2 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा –
बाबर आझमला बाहेर करताच पाकिस्तान विजयी, घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनंतर जिंकला कसोटी सामना!
भारत-न्यूझीलंड कसोटीत रवींद्रनं ठोकलं शतक, 12 वर्षांनंतर झाला हा पराक्रम!
टीम इंडियाच्या अपयशानंतर अजिंक्य रहाणेची पोस्ट व्हायरल, व्हिडिओ टाकून म्हणाला…