---Advertisement---

डॅरिल मिचेलचे भारताविरुद्ध विश्वविक्रमी शतक, ‘या’ यादीत पोहोचला टॉपवर

On: रविवार, जानेवारी 18, 2026 6:05 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) इंदौर येथे खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार शुबमन गिलचा हा निर्णय गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकांमध्ये योग्य ठरवला. त्यानंतर मात्र जी काही चौकार-षटकारांची बरसात सुरू झाली त्याने न्यूझीलंडच्या संघाने ३००चा आकडा पार केला. यामध्ये न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे.

मिचेलने रविवारी झालेल्या सामन्यात १३१ चेंडूत १३७ धावा केल्या. ज्यामध्ये १५ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. तसेच त्याने राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही शतक केले होते. तर वडोदरामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात ८४ धावा केल्या होत्या. यामुळे त्याच्या या मालिकेत एकूण ३५२ धावा झाल्या आहेत.

याबरोबरच मिचेल भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. मिचेलच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या नावे होता. त्याने २०१३मध्ये भारताविरुद्ध ३४२ धावा केल्या होत्या.

मिचेल तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत गिल आणि पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहेत. गिलने २०२३मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर बाबरने २०१६मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ३६० धावा केल्या होत्या. या यादीत बांग्लादेशचा इमरुल कायेस २०१८मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ३४९ धावा करत तिसऱ्या, श्रीलंकेचा पथुम निसांका चौथ्या आणि डी कॉक पाचव्या स्थानी आहेत.

आतापर्यंत मिचेलने भारताविरुद्ध मागील ७ वनडे सामन्यात ४ शतके केली आहेत. मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सने देखील शतकी खेळी केली. त्यामुळे तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या तीन सामन्यांची ही वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---