---Advertisement---

INDvsNZ: आता अश्विनही मागे राहिला नाही! म्हणाला, ” एवढी मेहनत करूनसुद्धा अर्शदीप…”

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 11:53 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना १८ जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेवन काय असणार यावर अनेकांनी त्यांचे तर्कवितर्क लावायला सुरूवात केली आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत असून भारताने दुसरा सामना कसा गमावला आणि त्यामागची कारणे पुढे येत आहे. या चर्चांमध्ये आता भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने उडी घेतली आहे.

सुनिल गावसकरांनंतर अश्विननेही भारतीय संघाच्या निवडीबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ पाहिला तर संघात अर्शदीप सिंगलाही निवडले आहे, मात्र तो दोन्ही सामन्यात बाकावरच बसलेला दिसला. त्याला संघात घेतले असून अंतिम अकरामध्ये खेळवले नाही यावर अश्विनने नाराजी व्यक्त केली आहे.

अर्शदीप वडोदरा आणि राजकोट या दोन्ही वनडे सामन्यात खेळला नाही. संघ नेमका त्याच्यासोबत काय निर्णय घेत आहे हे विचार करायला भाग पाडणारे आहे. सध्या तो भारतासाठी टी२०मध्ये उत्तम कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

तसेच अर्शदीपने १४ वनडे सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत. तरीही त्याला न्यूझीलंड विरुद्ध संधी दिली गेली नाही. त्याला कदाचित न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आराम दिला असण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर टी२० विश्वचषकही सुरू होणार आहे. यामुळे कदातिच त्याला ब्रेक दिला असावा, असे असले तरी तो २०२४च्या मध्यानंतरही नेहमीच भारताच्या टी२० संघाचा अंतिम अकराचा भाग राहिला नाही. यामुळे त्याच्या संघातील जागेवर विचार पडला आहे.

“भारतीय संघात सध्या गोलंदाजांमधील शर्यत सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना संधी दिली गेली जेणेकरून त्यांना अधिक अनुभव येईल, हे मी समजू शकतो. मात्र अर्शदीपबाबत काय. तो किती खेळला हे महत्वाचे नाही”, असे अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर म्हटले.

“अर्शदीपनेही मेहनत घेतली आहे मात्र तो सध्या संघात जागेसाठी लढताना दिसत आहे. यामुळे त्याचा धीर खचेल. तो जेव्हा खेळतो तेव्हा संघासाठी चांगली कामगिरी करतो. त्याला संघात घ्या आणि त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. मी पण या स्थितीतून गेलो असून असे नेहमी गोलंदाजांबाबत का घडते माहित नाही, ” असेही अश्विन पुढे म्हणाला.

इंदौरला होणाऱ्या वनडे सामन्यात आता भारतीय संघ कोणते बदल करेल याकडे लक्ष लागले आहे. मालिका निर्णायक सामना असल्याने अधिक प्रयोगही नाही करता येणार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---