भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा संघासाठी आणि त्याच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. खराब फॉर्ममुळे त्याच्यावर खूप टीका होतेय. विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर रहाणेला मुंबई कसोटीत संघातून वगळले पाहिजे, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू निखिल चोप्रा याने व्यक्त केले. मयंक अगरवालसारख्या युवा खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यापेक्षा रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवणे योग्य ठरेल, असे निखिलचे मत आहे. संथ गतीने धावा करण्याच्या चेतेश्वर पुजाराच्या सवयीवरही त्याने बोट ठेवले.
एका युट्यूब चॅनलवर संभाषणादरम्यान निखिल चोप्रा म्हणाला, ‘जेव्हा कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटीत संघात पुनरागमन करेल तेव्हा, मयंक अगरवालला वगळण्याऐवजी अजिंक्य रहाणेला वगळले पाहिजे. रहाणेची कसोटी क्रिकेटमधील सरासरी चांगली नाही. तो बऱ्याच काळापासून संघर्ष करताना दिसला आहे. युवा खेळाडूंना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. आगामी विदेश दौऱ्यांपूर्वी त्यांना संधी द्यायला हवी. जर तुम्ही मयंकला संघातून काढून टाकण्याचा विचार करत असाल तर, मुंबई कसोटीसाठी सूर्यकुमार यादवला संधी देणे चांगले ठरेल.’
निखिल पुढे म्हणाला, ‘चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याला भरपूर संधी दिल्याने निवडकर्त्यांना आता कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. भारतीय परिस्थितीतही चेतेश्वर पुजाराने बरेच दिवस शतक झळकावलेले नाही हे आश्चर्यकारक आहे. तो खूप चेंडूही खेळत आहे. त्याचे सलग निर्धाव चेंडू खेळणे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर सारख्या फलंदाजांना निराश करू शकते.’
अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत प्रज्ञान ओझानेही आपले मत मांडले होते. त्याने म्हटले होते की, जेव्हा फलंदाजाचे फूटवर्क योग्य नसते तेव्हा तो अडचणीत येतो. त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “अजिंक्य रहाणे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे असे समजू नका. परंतु त्याच्या खेळीचा तांत्रिक भाग लक्षात घेतला तर त्याच्या फूटवर्कमध्ये खरी अडचण आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही याकडे लक्ष वेधले आहे. जेव्हा तुमचे फूटवर्क चांगले नसेल तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता.”






