भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील सुपर-4 मधील सामना 5 विकेट्सने गमावला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला. भारताच्या या पराभवास वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला सर्वात मोठा जबाबदार धरले जात आहे.
अर्शदीपने पाकिस्तानच्या डावातील 18व्या षटकादरम्यान आसिफ अलीचा सोपा झेल सोडला होता, जो टर्निंग पाँईट ठरला. परंतु भारतीय संघाच्या पराभवासाठी एकटा अर्शदीप जबाबदार नसून कर्णधार रोहित शर्मासह 4 खेळाडूंचाही हात राहिला. या खेळाडूंनी नकळत काही चुका केल्या आणि भारतीय संघाच्या हातून सामना निसटला. त्याच खेळाडूंबद्दल येथे आपण जाणून घेऊ…
1. रोहित शर्मा
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित काहीसा गोंधळल्यासारखा दिसला. त्याला दुबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा योग्य वापर करता आला नाही. अष्टपैलू हार्दिक पंड्यासह भारतीय संघात पाचच गोलंदाज उपलब्ध होते. अशात रोहित दीपक हुड्डाकडून एक किंवा षटके गोलंदाजी करून घेऊ शकला असता. तसेच भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिकसारखे अनुभवी गोलंदाज महागडे ठरत असताना हुड्डा किफायतशीर षटक टाकू शकला असता. परंतु मैदानात रोहितला हा निर्णय घेता आला नाही.
2. भुवनेश्वर कुमार
भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषकाचा भाग नाही. अशात वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमारच्या हाती आहे. परंतु त्याने पाकिस्तानविरुद्ध 10 च्या इकोनॉमीने धावा लुटल्या. 4 षटके फेकताना 40 धावा देत त्याला फक्त एक विकेट घेता आली. तसेच त्याने पावरप्लेमध्ये जास्त धावा दिल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. हेदेखील भारताच्या पराभवाचे कारण ठरले.
3. हार्दिक पंड्या
पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरी सामन्यातील विजयाचा नायक राहिलेला हार्दिक सुपर-4 मधील सामन्यात मात्र सपशेल फेल ठरला. फलंदाजी करताना 2 चेंडूंचा सामना करून खराब फटक्यामुळे तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर गोलंदाजी करतानाही त्याने भरपूर धावा खर्च केल्या. 4 षटकांमध्ये त्याने 44 धावा दिल्या आणि फक्त एकच विकेट घेऊ शकला.
4. रिषभ पंत
दिनेश कार्तिकला बाहेर बसवत भारताच्या संघ व्यवस्थापनाने रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले होते. विस्फोटक डावखुरा फलंदाज पंतला हार्दिकच्या वर फलंदाजीला पाठवले गेले होते. जेणेकरून तो वेगाने धावा करेल. परंतु 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा करत खराब फटक्यामुळे तो बाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर रिझवानला डावलून नवाजला का दिला गेला सामनावीर पुरस्कार? हे होते कारण
बाबर आझमवर डोके धरायची वेळ! भारताविरुद्धच्या विजयाचा नायक सामन्यानंतर थेट रुग्णालयात
एक झेल काय सुटला, पाकिस्तानी चाहत्यांची अर्शदीपवर पातळी सोडून टिका! म्हणतायेतं ‘खलिस्तानी’





