भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. तो अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्वरुपात अर्थात कसोटी क्रिकेटमध्येही विस्फोटक फलंदाजी करताना दिसतो. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगलुरू येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामन्यात त्याने ताबडतोब अर्धशतक (Fastest Test Fifty) झळकावत जुन्या विक्रमांना मोडित काढले आहे. या अर्धशतकासह तो भारताकडून सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा खेळाडू तर बनलाच आहे, सोबतच त्याने माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याचा १६ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.
रिषभने मोडला धोनीचा मोठा विक्रम
रिषभने श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात विस्फोटक अर्धशतक झळकावले. केवळ २८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ५० धावांची खेळी केली. या जलद अर्धशतकासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा जगातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज (Fastest Fifty By Wicketkeeper) बनला आहे.
त्याने या विक्रमात माजी भारतीय यष्टीरक्षक धोनी आणि न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक इयान स्मिथ यांना मागे सोडले आहे. धोनीने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना केवळ ३४ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. त्याच्यापूर्वी इयान स्मिथने १९९० मध्ये पाकिस्तानविरुद्धच ३४ चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक केले होते. मात्र आता पंत विक्रमतोड २८ चेंडूंमध्ये अर्धशतक (Test Fifty In 28 Balls) करत या दोन्ही दिग्गजांना मागे सोडले आहे.
यष्टीरक्षकाद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक-
२८ चेंडू – रिषभ पंत, २०२२
३४ चेंडू – एमएस धोनी, २००६
३४ चेंडू – इयान स्मिथ, १९९०
कपिल देव यांचाही विक्रम काढला मोडित
रिषभने या अर्धशतकासह कपिल देव यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा कपिल देव, शार्दुल ठाकूर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी केला होता. कपिल देव यांनी १९८२ साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना ३० चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते. तसेच, शार्दुल ठाकूरने २०२१ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना ३१ चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते. याव्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना ३२ चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाला बनायचंय ‘ज्यूनियर युवराज’, वाचा ‘पावर हिटर’ची पूर्ण प्रतिक्रिया
पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे इंग्लिश गोलंदाज, बुमराहचा असेल बॉलिंग पार्टनर