वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेशी भिडणार आहे. २४ फेब्रुवारीपासून उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20 Series) खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी (२२ फेब्रुवारी) चार तास सराव (Team India’s Training Session) केला आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माच्या देखरेखीखाली हे सराव सत्र पार पडले. या सराव सत्रात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हादेखील सहभागी झाला होता.
अष्टपैलू जडेजा भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिकेतून जवळपास ३ महिन्यांनंतर भारतीय टी२० संघात पुनरागमन (Ravindra Jadeja Comeback) करेल. बीसीसीआयने जडेजाचा सराव सत्रातील व्हिडिओ आपल्या ट्विटर अकांउटवर शेअर केला आहे. यामध्ये जडेजा श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी खूप उत्साहित असल्याचे दिसत आहे.
जडेजा म्हणाला की, “भारतीय संघात पुनरागमन करून खूप चांगले वाटत आहे. मी आता आगामी टी२० आणि कसोटी मालिकेसाठी तयारी करतो आहे. खूपच चांगले वाटत आहे आणि मी उत्साहितही आहे की, अडीच महिन्यांनंतर मला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाणार आहे. त्यासाठी मी आता व्यवस्थित पुनर्वसन केले आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत माझ्या तंदुरुस्तीवर खूप कामही केले आहे.”
“मला या मालिकेचा भाग बनून खूप चांगले वाटत आहे. मी जवळपास ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर क्रिकेट खेळतो आहे. मी सध्या चांगल्या लयीत आहे आणि आजचे पहिले सराव सत्र करून चांगले वाटत आहे,” असेही त्याने पुढे म्हटले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1496335570452492288?s=20&t=v7cr3MjH_h6kRfhBN2o9qA
विश्वचषकात खेळला होता शेवटचा टी२० सामना
जडेजाने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत शेवटचे खेळल्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा टी२० सामना टी२० विश्वचषक २०२१ मध्ये नामिबिया संघाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकांमध्ये तो खेळू शकला नव्हता.






