भारत विरुद्ध वेस्ट इंडिज बहुप्रतीक्षीत एकदिवसीय मालिकेला रविवारी (27 सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन्ही संघामध्ये तिरुअनंतपुरमध्ये पहिला सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक मोठे बदल दिसले. मोहम्मद सिराजला बाकावर बसवले, तर नमन धीरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सिराजला बाकावर बसवणे भारताला चांगलेच नुकसानदायक ठरताना दिसले, कारण विंडीजच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करत विक्रम केले आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिराज नसल्याने भारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गुरनूर ब्रार, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर आली. त्यात वेस्ट इंडिजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्ह्ज यांनी संघाला अप्रतिम सुरूवात करून दिली. त्यांनी नितीशच्या पहिल्याच षटकात 18 धावा वसूल केल्या. दोघांनी आपले सातत्य कायम राखले आणि 19.2 षटकांत 135 धावा करत 16 वर्षांचा दुष्काळ संपवला.
2009 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांनी भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या. जॉन-जस्टिन यांच्याआधी ख्रिस गेल आणि रुनको मोर्टन यांनी भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
तसेच जॉन-जस्टिन यांची भागीदारी भारताविरुद्ध भारतात वेस्ट इंडिजची एकदिवसीय मालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. दिग्गज गार्डन ग्रीनिज आणि फिल सिमन्स यांच्या नावावर भारताविरुद्ध भारतात सर्वात मोठी एकदिवसीय भागीदारी आहे. त्यांनी 1988 मध्ये 164 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या स्थानावर 1983 मधील 149 धावांच्या भागीदारीचा क्रमांक लागतो, जी ग्रीनिज यांनी डेसमंड हेंस यांनी मिळून केली होती.
जॉन-जस्टिन जोडीला कुलदीप यादवने तोडले. भारतीय फिरकीपटूने वेस्ट इंडिजच्या डावाच्या 20 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जॉनला 62 धावांवर प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद केले. जॉनने 60 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने या धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 103.33 राहिला. तो बाद झाला तेव्हा जस्टिन 66 धावांवर होता आणि वेस्ट इंडिजची स्थिती 20 षटकांत 136 धावसंख्येवर एक बाद अशी होती.
या सामन्यासाठी भारताच्या संघात ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहेत. तसेच ही मालिका वेस्ट इंडिजसाठी 2027 च्या विश्वचषकास पात्रता ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. (1st ODI, Justin Greaves and John Campbell since 2009 both the openers from West Indies have gone past fifty vs IND ODI)






