झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाने (ZIMvsIND) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. भारताने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शनिवारी (२० ऑगस्ट) झालेला दुसरा सामना ५ विकेट्सने जिंकला आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. यावेळी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याने नाबाद ४३ धावांची खेळी केल्याने भारताचा विजय सोपा झाला आहे. त्याने उत्तुंग षटकार मारत भारताला सामना जिंकून दिला आहे.
भारतीय संघ या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या जागी शार्दुल ठाकुर याला संघात घेतले. हा मोठा बदल भारतासाठी फायद्याचाच ठरला आहे. शार्दुलने ७ षटकात ३८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत विरोधी संघाला कमी धावसंख्येवरच रोखले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वे संघाची सुरूवात अडखळतच झाली. ८.४थ्या षटकातच मोहम्मद सिराज याने सलामावीर तकुज्वानशे कायतानो याला सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर काही वेळातच दुसरा सलामावीरही बाद झाला. इनोसंट काया याला शार्दुल ठाकुरने सॅमसनकरवी झेलबाद केले.
झिम्बाब्वेकडून सीन विलियम्स आणि रेयान बर्ल यांनी सर्वाधिक धावा केल्या. विलियम्सने ४२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारत ४२ धावा केल्या. तर बर्लने नाबाद ३९ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणताच फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकला नाही. यामुळे त्यांनी ३८.१ षटकात सर्वबाद १६१ धावसंख्या उभारली. यावेळी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतालाही सुरूवातीला राहुलच्या स्वरूपात धक्का बसला. राहुल १ धाव करताच तंबूत परतला. नंतर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. धवनने २१ चेंडूत ४ चौकार मारत ३३ धावा केल्या. तर गिलने ३४ चेंडूत ६ चौकार फटकारत ३३ धावा केल्या.
राहुलप्रमाणे इशान किशन याचीही विकेट लवकर गेल्याने भारत थोडा दबावात आला होता. मात्र दीपक हुड्डा आणि सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. हुड्डा हा २५ धावा करत बाद झाला. त्यानंतर सॅमसनने अक्षरसोबत सहाव्या विकेटसाठी १४ धावांची भागीदारी केली.
भारताने हा सामना ५ विकेट्स आणि १४६ चेंडू शिल्लक राखत जिंकला. प्रथम ग्लोव्ह्ज नंतर फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करणारा सॅमसन या सामन्याचा सामनावीर ठरला आहे. तर या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दु:खद बातमी। गोलंदाजाचा घातक बॉल छातीत लागल्याने फलंदाजाने गमावले प्राण
यंदा प्रत्येक घरात ‘या’ दिग्गजांचा आवाज घुमणार, वाचा आशिया चषकातील समालोचकांची संपूर्ण यादी
थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमला दुहेरीत विजेतेपद, एकेरीत उपविजेता