5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताचा 13 धावांनी पराभव केला. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची फलंदाजी खूपच खराब राहिली.
हरारे येथे प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकांत 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 102 धावांवर गडगडला. आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा सामना रविवारी होणार आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात झालेल्या आपल्या तीन चुका सुधारल्या नाहीत, तर भारताला दुसऱ्या टी20 सामन्यातही पराभवाला सामोरं जावं लागू शकतं.
सर्वप्रथम भारतीय सलामीवीरांना संघाला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला होता. तो शुबमन गिलसोबत ओपनिंगसाठी आला होता. गिलही 31 धावा करून बाद झाला. या सामन्यात तो भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. दुसऱ्या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही, संघाला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या सामन्यात टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरलाही कमाल करावी लागणार आहे. भारतीय संघाची मधली फळी पुन्हा फ्लॉप झाली तर सामना जिंकणं कठीण होऊन जाईल. पहिल्या सामन्यात रिंकू सिंह 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो शून्यावर बाद झाला. तर रियान पराग 2 धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेलही अवघ्या 6 धावा करून बाद झाला. यामुळे भारताच्या मधल्या फळीला फलंदाजीवर काम करावं लागणार आहे.
टीम इंडियाला क्षेत्ररक्षणाबरोबर गोलंदाजीवरही भर द्यावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं 90 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांना शेवटची जोडी बाद करता आली नाही. त्यामुळे जवळपास 25 धावा अधिक निघाल्या. या 25 धावा टीम इंडियासाठी महागड्या ठरल्या, ज्या पराभवाचं कारण ठरल्या. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणही तगडं करावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम
भारतीय संघाची नाचक्की! दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ! अवघ्या काही क्षणांत अख्खं स्टेडियम हाऊसफुल्ल