सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मजबूत रेकॉर्ड आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय कसोटी संघाच्या कायम रडारवर असतो. यावेळी ईश्वरनची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच ईश्वरनला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलंय. मात्र ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला.
पहिल्या डावात ईश्वरनच्या बॅटमधून केवळ सात धावा आल्या होत्या. या 30 चेंडूंच्या खेळीत त्याच्या बॅटमधून एकही चौकार निघाला नव्हता आणि तो झेलबाद झाला. पहिल्या डावात संपूर्ण भारतीय फलंदाजी अपयशी ठरली होती. संघ केवळ 107 धावांवर ऑलआऊट झाला होता. यानंतर ईश्वरन दुसऱ्या डावात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु यावेळी तो दुर्दैवी ठरला. तो 32 चेंडूत 12 धावा करून धावबाद झाला.
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी ईश्वरननं सलग चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शतकं झळकावली होती. या चार शतकांपूर्वी त्यानं द्विशतकही झळकावलं होतं. या काळात तो काही डावात नाबादही राहिला होता. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याची बॅट शांत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी बॅकअप सलामीवीर म्हणून ईश्वरनचा विचार केला जात आहे. रोहित शर्मा मालिकेतील किमान एका कसोटी सामन्यासाठी अनुपलब्ध राहणार आहे. तो बाहेर पडल्यास ईश्वरनला संधी मिळू शकते. अशा स्थितीत त्याला पुढील सामन्यात आपली ताकद दाखवावी लागेल.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ईश्वरनची आकडेवारी चांगली आहे. येथे त्याची सरासरी 50च्या आसपास आहे आणि त्याला मोठी खेळी कशी खेळायची हे माहित आहे. त्यानं आतापर्यंत 99 सामन्यात 7638 धावा केल्या आहेत. ईश्वरननं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27 शतकं आणि 29 अर्धशतकं ठोकली आहेत. यावरून त्याला अर्धशतकाचं रूपांतर शतकात कसं करायचं हे त्याला चांगलंच ठाऊक आहे.
डेहराडूनमध्ये जन्मलेला ईश्वरन बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मात्र तो आतापर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलेला नाही. 29 वर्षीय ईश्वरन याआधी भारतीय संघाचा भाग होता. परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. यावेळी तो ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा –
सरफराज खानवर चिडलेल्या किवी फलंदाजांची अंपायरकडे तक्रार, रोहित-कोहलीनं सांभाळलं प्रकरण
पाकिस्तानकडून भारताचा पराभव, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक; अवघ्या 5 षटकात ठोकल्या 121 धावा!
लाल कुर्ता, कपाळावर टिळा! महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा VIDEO