येत्या 11 ते 30ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबई अशा तीन ठिकाणी सुरू होत असलेल्या फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेसाठी भारतीय क्रिडा क्षेत्र सज्ज झाले आहे. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीचा प्रारंभ केंद्रीय क्रिडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, फिफाचे लिंडसे टारप्ले, माजी भारतीय कर्णधार सुनील छेत्री व आशालता देवी यांच्या उपस्थितीत पार पडला. fifa.com/tickets या वेबसाईटवर फुटबॉल प्रेमींना आपली जागा आरक्षित करता येणार आहे. यावेळी असंख्य फुटबॉल प्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचा भारतीय फुटबॉल क्षेत्रावर होणाऱ्या सखोल परिणामांचा विचार करुन तळागाळातील महिला प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नेतृत्व गुण रुजवण्यासाठी कोच एज्युकेशन स्कॉलरशिप प्रोग्राम या उपक्रमाची सुरुवात याआधीच करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या 16 सत्रांमधून सुमारे 400महिला प्रशिक्षक तयार झाले आहेत.
या निमित्ताने विविध उपक्रमांची माहिती देताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष व संयोजन समितीचे चेअरमन कल्याण चौबे म्हणाले की, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेचे आयोजन हा केवळ एक सन्मानच नसून आमच्यासाठी बहुमोल संधी आहे. या स्पर्धेचा भारतीय फुटबॉल वर होणारा सकारात्मक परिणाम ध्यानात घेऊन फिफा, भारत सरकार, भारतीय फुटबॉल महासंघ, विविध राज्यांची सरकारे आणि प्रायोजक यांनी एकत्र येऊन महिला फुटबॉलच्या विकासाठी विविध योजना आखल्या आहेत.
कल्याण चौबे पुढे म्हणाले की, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेसारख्या प्रमुख द्वैवार्षिक स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने तळागाळापर्यंत च्या मुली व महिलांपर्यंत फुटबॉलचा प्रसार करून तसेच त्यांना विविध साधन सामुग्री देऊन आणि प्रशिक्षणाची सोय करुन त्यांच्यात नेतृत्व गुण रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची आम्हाला मिळाली संधी आहे. या निमित्ताने कोच एज्युकेशन स्कॉलरशिप प्रोग्राम तसेच द ड्रीम फुटबॉल कार्निवल आणि अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी मदत केल्याबद्दल मी प्रायोजकांचा आभारी आहे.
कोणताही लिंगभेद न ठेवता सर्व वयोगटाच्या मुला-मुलींचा सहभाग असणाऱ्या किक ऑफ द ड्रीम फुटबॉल कार्निवलची सुरुवात महाराष्ट्र, गोवा आणि ओडिशा येथे एप्रिल 2022मध्येच करण्यात आली. या तीन राज्यांमधील सुमारे 70000मुला-मुलींना फुटबॉल चे विविध उपक्रम आणि फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सहभागाची संधी मिळाली आहे.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी बजावलेली असामान्य कामगिरी लक्षात घेऊन सहा महिलांना ऑफिशियल तिकीट लॉन्च प्रोग्रामसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या सहा महिलांना स्पर्धेच्या पाहिल्या सहा तिकीट धारक होण्याचा मान देण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र, ओडिशा आणि गोवा या राज्याच्या मुख्यमत्र्यांच्या हस्ते भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबई या तीन यजमान शहरांचे लोगो अनावरण करण्यात आले.
चौबे म्हणाले की, या स्पर्धेसाठी आम्ही आतापर्यंत सर्व आव्हाने पार केली असून आता सहभागी सोळा संघांमधील खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा प्रदान करुन जगभरातील क्रिडा प्रेमींसाठी सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना आम्ही देणार आहोत. स्पर्धेच्या तीनही यजमान शहरांमधील स्टेडियम मध्ये येऊन या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी समस्त भारतीय फुटबॉल प्रेमींना केले. या स्पर्धेच्या निमित्ताने फिफा करंडक प्रथमच भारतात उंचावला जाण्याची ऐतिहासिक घटना घडणार आहे असेही त्यांनी नमूद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित शर्माची दिलदारी! सामना जिंकल्यानंतर पोहोचला थेट प्रेक्षकांकडे, एकाने तर हद्दच केली
‘काही गोष्टी कधीच बदलत नाहीत!’, रैनाच्या वर्ल्ड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधील कॅचची होत आहे चर्चा