उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते, असा समज समाजात आहे. हाच समज दूर करण्यासाठी तसेच डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने १३ ऑगस्ट हा जागतिक डावखुरा दिवस (world left handers day) साजरा केला जातो.
याच निमित्ताने या लेखात आपण भारताच्या सार्वकालिन उत्कृष्ट डावखुऱ्या खेळाडूंचा आढावा घेणार आहोत. विशेष म्हणजे या यादीत समाविष्ट असणारे सर्व खेळाडू २०००नंतरही क्रिकेटमध्ये सक्रिय राहिले आहेत.
भारतीय संघाने १९८३ आणि २०११ च्या विश्वचषकांवर आपले नाव कोरले असून भारतीय संघात नेहमीपासूनच अनेक उत्कृष्ट खेळाडू राहिले आहेत. ज्यांनी वेगवेगळ्या काळात चमकदार कामगिरी करत भारतीय संघाला विजयी केले आहे.
क्रिकेटमध्ये नेहमीच डावखुऱ्या फलंदाजांना फलंदाजी करताना पाहून खूप मजा येते. ब्रायन लारा, मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, ऍडम गिलख्रिस्ट आणि कुमार संगकारासोबतच अनेक डाव्या हाताने फलंदाजी करणारे शानदार खेळाडू राहिले आहेत. ज्यांनी क्रिकेटला आणखी रंजक बनविले आहे. केवळ फलंदाजच नव्हे, तर डावखुऱ्या गोलंदाजांची भूमिकाही उल्लेखनीय राहिली आहे. भारतीय संघातही अनेक शानदार डावखुरे खेळाडू होऊन गेले आणि आहेत. त्याच खेळाडूंपैकी काही खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या डावखुऱ्या खेळाडूंचा सार्वकालिन अकरा जणांचा वनडे संघ- India all Time left handed ODI XI
१. सौरव गांगुली (कर्णधार)
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि डावखुरा फलंदाज सौरव गांगुली (Sourav Ganguly) निश्चितच या संघाचा मुख्य सदस्य राहणार आहे आणि तो सर्वोत्तम डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. गांगुली आपल्या वनडे कारकीर्दीत ३११ सामन्यांमध्ये ४१.०२ च्या सरासरीने आणि ७३.७० च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ शतके आणि ७२ अर्धशतके ठोकली आहेत.
गांगुलीची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही १८३ आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना ३८.४९ च्या सरासरीने १०० विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच गांगुली या संघाचा कर्णधारही असणार आहे.
२. शिखर धवन
भारतीय संघाचा सध्याचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) २०१३ पासून भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये त्याची आकडेवारी उत्तम राहिली आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो मालिकावीरही राहिला होता.
धवनने आपल्या वनडे कारकीर्दीत आतापर्यंत १५५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४५.४१ च्या सरासरीने ६४९३ धावा केल्या आहेत. त्यादरम्यान त्याने १७ शतके आणि ३७ अर्धशतके ठोकली आहेत. धवनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या १४३ धावा आहेत.
३. गौतम गंभीर
विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्यात ९७ धावांची उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण खेळी करणारा डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपल्या संपूर्ण कारकीर्दीत भारताला आपल्या हिंमतीवर विजय मिळवून दिला आहे. गंभीरमध्ये एका बाजूने डाव सांभाळण्याबरोबरच मोठमोठे फटके खेळण्याचीही क्षमता होती.
गंभीरने आपल्या वनडे कारकीर्दीत १४७ सामने खेळताना ३९.६८ च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या आहेत. त्यात ११ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेशही आहे. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १५० आहे.
४. युवराज सिंग
भारतीय संघाचा यशस्वी अष्टपैलू आणि २०११ विश्वचषकातील मालिकावीर युवराज सिंग (Yuvraj Singh) केवळ डावखुऱ्या खेळाडूंच्या सार्वकालिन अकरा जणांच्याच नाही, तर तो कोणत्याही अकरा जणांच्या वनडे संघात स्थान मिळवू शकतो. युवराज एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने १९ वर्षांखालील, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी२० विश्वचषक, आयपीएल आणि टी२० ट्रॉफी या सर्व स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघातील त्याचे योगदान कदाचित कोणीही विसरू शकणार नाही.
युवराजने आपल्या वनडे कारकीर्दीत आतापर्यंत ३०४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही १५० आहे.
५. सुरेश रैना
सुरेश रैना (Suresh Raina) हा भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याचबरोबर तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. डावखुऱ्या फलंदाज रैनाने आपल्या वनडे कारकीर्दीत एकूण २२६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद ११६ आहे.
६. पार्थिव पटेल (यष्टीरक्षक)
भारतीय संघात एमएस धोनी (MS Dhoni) असल्यामुळे इतर यष्टीरक्षक फलंदाजांना अधिक संधी मिळाल्या नाहीत. परंतु असे असले तरीही पार्थिव पटेल (Parthiv Patel) एक शानदार यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. भारतासाठी खेळताना पटेलने वनडेत ३८ सामन्यांमध्ये २३.७४ च्या सरासरीने ७३६ धावा केल्या आहेत. त्याला आपल्या वनडे कारकीर्दीत एकही शतक करता आले नाही. परंतु त्याने ४ अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही ९५ आहे.
विशेष म्हणजे भारताकडून आतापर्यंत केवळ २ डावखुरे यष्टीरक्षक फलंदाज खेळले आहेत. त्यातील एक म्हणजे पटेल आणि दुसरा रिषभ पंत.
७. रविंद्र जडेजा
भारतीय संघाबद्दलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची चर्चा केली, तर त्यामध्ये सर्वात अव्वल क्रमांकावर भारतीय संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) नाव नक्कीच घेतले जाईल. केवळ क्षेत्ररक्षक म्हणून नव्हे, तर फलंदाजी आणि गोलंदाजीनेही जडेजाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आपल्या वनडे कारकीर्दीत आतापर्यंत १७१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.६३ च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये केवळ १३ अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही ८७ आहे.
गोलंदाजी करताना त्याने ३७.३७ च्या सरासरीने १८९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ही ३६ धावा देत ५ विकेट्स आहे.
८. इरफान पठाण
जर भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणला (Irfan Pathan) जर दुखापत झाली नसती, तर तो भारतीय संघाचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असता. असे असले तरी भारताकडून खेळताना डावखुरा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज पठाणने उत्तम कामगिरी केली.
भारतीय संघाकडून आतापर्यंत पठाणने १२० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.३९ च्या सरासरीने १५४४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही ८३ आहे.
याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना २९.७२ च्या सरासरीने १७३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ही २७ धावा देत ५ विकेट्स आहे. याबरोबरच तो आपल्या वनडे कारकीर्दीतील शेवटच्या सामन्यात सामनावीरदेखील राहिला होता.
९. झहीर खान
झहीर खान (Zaheer Khan) हा भारताच्याच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम डावखुऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. झहीरने भारताला २०११च्या विश्वचषकात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. याव्यतिरिक्त तो २००३, २००७ आणि २०११ विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही राहिला आहे. झहीरने २०० वनडे सामने खेळताना २९.४३ च्या सरासरीने २८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ही ४२ धावा देत ५ विकेट्स आहे.
१०. आशिष नेहरा
इरफानप्रमाणे आशिष नेहराचीही (Ashish Nehra) कारकीर्द दुखापतींमुळे दीर्घकाळ टिकली नाही. परंतु त्याने भारताकडून नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो २०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही सदस्य होता. नेहराने त्या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
नेहराने भारताकडून आतापर्यंत १२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.७१ च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ही २३ धावा देत ६ विकेट्स आहे.
११. आरपी सिंग
एकेकाळी आरपी सिंग (RP Singh) भारतीय संघातील सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज राहिला आहे. त्याच्यात उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू आत वळविण्याची क्षमता होती. त्यामुळेच तो गोलंदाजीमध्ये यशस्वी झाला. त्याने भारताकडून आतापर्यंत ५८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३३.९५ च्या सरासरीने ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ही ३५ धावा देत ४ विकेट्स आहे.