श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घोषित केल्याप्रमाणे भारत, श्रीलंका आणि बांगलादेश संघांदरम्यान श्रीलंकेत टी २० तिरंगी मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका ६ मार्च पासून सुरु होईल. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध भारत असा पार पडणार आहे.
या तिरंगी मालिकेचे नाव निदाहास ट्रॉफी असून ही मालिका श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवण्यात येणार आहे. ही तिरंगी मालिका आधी ८ मार्च पासून सुरु होणार होती पण ही तारीख बदलून दोन दिवस आधीच म्हणजे ६ मार्चपासूनच या मालिकेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यामुळे मंगळवारी होणारा अंतिम सामना रविवारी होईल. क्रिकबझच्या रिपोर्ट प्रमाणे भारत आणि बांगलादेश संघ ४ मार्चला श्रीलंकेत दाखल होतील. बांगलादेशचा संघ मालिका सुरु होण्याआधी एक सराव सामना खेळेल तर भारत थेट मालिकेतील पहिला सामना खेळेल.
या तिरंगी मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन सामने खेळेल.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष्य थिलंगा सुमाथिपाला यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीलंका बोर्डाला टीव्ही प्रसारणाचे आणि मार्केटिंगच्या हक्कातून ६.५ मिलियन यूएस डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा आहे.
अशी असेल निदाहास ट्रॉफी स्पर्धा
६ मार्च – श्रीलंका विरुद्ध भारत
८ मार्च -बांगलादेश विरुद्ध भारत
१० मार्च -श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
१२ मार्च – भारत विरुद्ध श्रीलंका
१४ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश
१६ मार्च – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१८ मार्च – अंतिम सामना





